खडसेंसोबत कार्यालयही गेले! मुक्ताईनगरमध्ये भाजपला जागा शोधावी लागणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2020 06:47 PM2020-10-24T18:47:02+5:302020-10-24T18:52:40+5:30
Eknath Khadse in NCP : एरव्ही खडसे शहरात आले तर जिल्हा बँक शाखे शेजारील या कार्यालयात येऊन बसतात. अनेक वर्षांपासून भाजपा कार्यकर्त्याची नाळ या कार्यालयाशी जुळलेली आहे.
मुक्ताईनगर : माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर शहरातील भारतीय जनता पार्टी तालुका कार्यालयाचे बॅनर काढून कुलूप लावण्यात आहे. लवकरच हे कार्यालय आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच्या फलकासह दिसून येणार आहे.
एरव्ही खडसे शहरात आले तर जिल्हा बँक शाखे शेजारील या कार्यालयात येऊन बसतात. अनेक वर्षांपासून भाजपा कार्यकर्त्याची नाळ या कार्यालयाशी जुळलेली आहे. निवडणुकांच्या प्रचाराचे नियोजन येथूनच होत होते. आता खडसे राष्ट्रवादी पक्षात गेल्याने या कार्यालयाचे रुपडेही बदलणाऱ आहे. या कार्यालयावरील भाजपचे फलक काही दिवसांपूर्वीच काढले गेले आहे. सध्या नाथाभाऊ समर्थक मुंबई गेल्याने दोन दिवसांपासून कार्यालय हे कुलूप बंद आहे. कार्यकर्ते परततील तेव्हा कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे फलक लागून कार्यालय पुन्हा सुरू होईल, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
सुप्रिया सुळे यांनी घडवला अजित पवार-खडसे संवाद
माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेश सोहळ्याला उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार हे आजारी असल्याने येऊ शकले नाहीत; मात्र त्यांनी व्हीडिओ कॉलवरुन खडसे यांचे पक्षात स्वागत केले. खासदार सुप्रिया सुळे यांनी अजितदादांचे एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांच्याशी व्हीडिओ कॉलवरुन बोलणे करून दिले.
खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याची चर्चा होती. काही प्रसारमाध्यमांनी तसे वृत्त दिले होते. यावर स्वत: पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी त्या वृत्ताचे खंडन केले. ते म्हणाले, पक्षातील अनेकांना कोरोनाची लागण झाली. त्यातून ते बरेही झाले. खबरदारीचा उपाय म्हणून अजित पवार काळजी घेत आहेत. खडसे यांना जितेद्र आव्हाड यांच्याकडील गृहनिर्माण खाते देण्यात येणार असल्याची चर्चा होती. त्यावरही पवारांनी खुलासा केला असून सध्या मंत्रिमंडळात कोणताही बदल होणार नाही. खडसे हे कोणत्याही पदासाठी पक्षात आलेले नाहीत, असेही ते म्हणाले.
एकनाथ खडसेंचा राजकीय प्रवास कसा होता?
१९८० मध्ये एकनाथ खडसे यांनी भाजपा कार्यकर्त्याच्या रुपात सक्रिय राजकारणात प्रवेश केला. उत्तर महाराष्ट्रात भाजपाचा पाया प्रस्थापित करण्यात एकनाथ खडसेंचा मोठा वाटा मानला जातो. लेवा समाजातील असलेल्या खडसेंकडे ओबीसी नेतृत्व म्हणून पाहिले जाते. एकनाथ खडसे यांनी लढवलेली पहिली निवडणूक कोथडी ग्रामपंचायतीची होती. मात्र पहिल्याच निवडणुकीत खडसेंना पराभवाचा धक्का बसला होता. पुढे, १९८७ मध्ये त्याच कोथडी गावाचे ते सरपंच झाले. १९८९ मध्ये मुक्ताईनगर मतदारसंघातून ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले. सलग सहा टर्म (१९८९ – २०१९) म्हणजे तब्बल तीस वर्ष मुक्ताईनगर हा खडसेंचा बालेकिल्ला राहिला.
१९९५ ते १९९९ मध्ये शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये खडसेंनी अर्थ आणि सिंचन या दोन मंत्रालयांची जबाबदारी स्वीकारली होती. खडसेंनी नोव्हेंबर २००९ ते ऑक्टोबर २०१४ या काळात विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहिले आहे. (Eknath Khadse Political Career)
२०१४ मध्ये एकनाथ खडसे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत अग्रस्थानी मानले जात होते. पण अखेर देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे महसूल मंत्रालयाची धुरा होती. मात्र भ्रष्टाचाराच्या आरोपातून ३ जून २०१६ रोजी एकनाथ खडसेंवर मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची वेळ आली. २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत भाजपाने एकनाथ खडसे यांना तिकीट नाकारलं होतं. त्यांच्याऐवजी कन्या रोहिणी खेवलकर-खडसे यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार चंद्रकांत लिंबा पाटील यांनी १९८७ मतांनी त्यांचा पराभव केला.