आता राष्ट्रवादीचा पाठिंबा नको, भाजपा पदाधिकाऱ्यांची भूमिका; महापौरपदातून घेणार माघार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:15 AM2021-06-03T04:15:48+5:302021-06-03T11:31:16+5:30
महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. सुजय विखे यांच्या अध्यक्षतेखाली विळदघाट येथे शहर भाजपचे पदाधिकारी व नगरसेवकांची बैठक बुधवारी झाली.
अहमदनगर : महापौर पदाच्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला पाठिंबा न देता तटस्थ राहावे, असे सांगून महापौर पदासाठी आता फरपट नकोच, अशा शब्दात भाजप पदाधिकारी, नगरसेवकांनी भावना व्यक्त केल्या.
महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. सुजय विखे यांच्या अध्यक्षतेखाली विळदघाट येथे शहर भाजपचे पदाधिकारी व नगरसेवकांची बैठक बुधवारी झाली. या बैठकीस शहरातील भाजप नगरसेवकांसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. सुरुवातीला विखे यांनी पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षाकडे महापौर पदासाठी उमेदवार नाही. तसेच सत्ता स्थापनेसाठी पुरसे संख्याबळ नाही. मागील अडीच वर्षे राष्ट्रवादीने पाठिंबा दिल्याने महापालिकेत भाजपची सत्ता आली. सेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिला. त्यामुळे भाजपाला महापौर व उपमहापौर पद मिळाले; परंतु यापुढे कुणाच्याही मागे फरपटत न जाता तटस्थ राहावे, अशी भावना पदाधिकाऱ्यांची व्यक्त केली. त्यानंतर नगरसेवकांची स्वतंत्र बैठक घेण्यात आली. पक्ष जो आदेश देईल, तो सर्वांना मान्य राहील. पक्षाने महापौर निवडणुकीबाबत निर्णय घ्यावा, असे मत नगरसेवकांनी व्यक्त केले असल्याचे समजते.
वस्तुस्थिती फडणवीस यांच्यासमोर मांडणार
भाजपच्या पदाधिकारी व नगरसेवकांची मते जाणून घेतल्यानंतर वस्तुस्थिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडली जाईल. यापुढे सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय होतील. आपण स्वत: शहरात लक्ष घालणार असून, प्रभागनिहाय बैठका घेऊन प्रश्न सोडविणार असल्याचे अश्वासन खासदार विखे यांनी यावेळी दिले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
महापौर निवडणुकीबाबत पदाधिकारी व नगरसेवकांची मते जाणून घेण्यासाठी बैठक झाली. सर्वांनी आपापले मत व्यक्त केले असून, अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. पक्षाने घेतलेला निर्णय सर्वांना मान्य राहील.
- भैया गंधे, शहर जिल्हाध्यक्ष, भाजप