अबब! चंद्रकांत पाटलांनी सांगितला भलामोठा आकडा; २०२४ च्या निवडणुकीत लक्ष्य साध्य करणार?
By प्रविण मरगळे | Published: February 12, 2021 11:49 AM2021-02-12T11:49:59+5:302021-02-12T11:53:12+5:30
BJP Chandrakant Patil News: २०१४ च्या निवडणुकीत जवळपास १७ कोटी मतदान घेऊन देशात भाजपाचं सरकार आलं, त्या निवडणुकीत भाजपाला २८२ जागा मिळाल्या
मुंबई – आगामी लोकसभा निवडणुका २०२४ मध्ये होणार असल्या तरी या निवडणुकांसाठी भाजपाने आतापासून प्रयत्न सुरू केल्याचं दिसून येत आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना येत्या २०२४ च्या निवडणुकीत तब्बल ३० कोटी मतं आणि ४०० पेक्षा अधिक जागा देशभरात जिंकायच्या आहेत असा दावा केला आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, २०१४ च्या निवडणुकीत जवळपास १७ कोटी मतदान घेऊन देशात भाजपाचं सरकार आलं, त्या निवडणुकीत भाजपाला २८२ जागा मिळाल्या. तर २०१९ च्या निवडणुकीत भाजपाला २२ कोटी मतदान झालं, या निवडणुकीत ३०३ जागा भाजपानं पटकावल्या. त्यामुळे आता पुढील २०२४ निवडणुकीत भाजपाला देशात ३० कोटी मतं आणि ४०० पेक्षा अधिक जागा जिंकायच्या आहेत असं विधान त्यांनी केले.(BJP Chandrakant Patil Statements on 2024 Lok Sabha Election)
त्याचसोबत देशात सरकार बनवण्यासाठी २७२ जागांचे बहुमत असताना ४०० जागा का असा प्रश्न पडू शकतो, पण काही कायदे असे आहेत ज्यासाठी संसदेत पक्षाला तीन चर्तुर्थांश बहुमताची गरज पडते, म्हणून भाजपाला ३० कोटी मतं लागतील. त्यामुळे कार्यकर्त्यांनी लोकांची मदत करत असताना जास्तीत जास्त मतं भाजपाच्या कमळ चिन्हासोबत कशी जोडता येतील यासाठी प्रयत्नशील राहावं असं आवाहन चंदक्रात पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले, याबाबत ईटीव्हीने बातमी दिली आहे.
लघु उद्योगांना मोदी सरकारने मदत केली
कोरोनाच्या काळातील अनेक समस्या उद्योग आघाडीने सोडवल्या. लघु उद्योजकांच्या अनेक मागण्या मोदी सरकारच्या कार्यकाळात पूर्ण करण्यात आल्या. त्यामुळे विविध सुविधा देण्यात आल्या, महाराष्ट्र सरकार असो केंद्र सरकारकडेही काहीही प्रश्न असले तरी समस्या असतील तिथे मांडल्या पाहिजेत, आंदोलन करू शकत नसाल तरी निवेदन देऊन त्या समस्या पुढे आणाव्यात, त्यामुळे उद्योग आघाडीसोबत माणूस जोडला जाईल, त्याचा फायदा निश्चितच भाजपाला होणार आहे असं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.
...तर मनसेसोबत युती होऊ शकते
आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने भाजपाने कंबर कसली आहे, त्यातच शिवसेना-राष्ट्रवादीआणि काँग्रेस एकत्रित निवडणुका लढणार आहेत, त्यामुळे भाजपाची एकाकी लढाई महाविकास आघाडीसोबत असणार आहे, यातच मनसेला सोबत घेणार का? असा सवाल वारंवार पत्रकारांकडून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विचारला जात होता, त्यावर बोलताना पाटील म्हणाले की, मनसेने अमराठी नको ही भूमिका बदलावी, प्रत्येक राजकीय पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, मनसेत उत्तर भारतीय प्रवेश करत असतील तर आनंद आहे. मनसेच्या हिंदुत्वाबद्दल शंका नाही, त्यामुळे मनसेसोबत युती होऊ शकते असं विधान चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.