फ्री वायफायच्या पासवर्डमधून केजरीवालांची खिल्ली; डिजिटल प्रचारातून भाजपा जिंकणार दिल्ली?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 09:38 AM2019-03-26T09:38:43+5:302019-03-26T09:39:48+5:30
भाजपाचा डिजिटल रथ एक एप्रिलपासून रस्त्यावर धावणार
नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक जिंकून पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यासाठी भाजपानं कंबर कसली आहे. आम आदमी पार्टीची सत्ता असलेल्या दिल्लीत यश मिळवण्यासाठी भाजपानं हायटेक प्रचार सुरू केला आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये करण्यात आलेल्या कामांचा प्रचार करण्यासाठी भाजपानं डिजिटल रथाची मदत घेतली आहे. या रथांवर स्क्रीन लावण्यात आली असून त्यावर मोदी सरकारच्या कामगिरीची माहिती देणारे व्हिडीओ दाखवले जाणार आहेत. या रथाच्या माध्यमातून गल्लोगल्ली जाऊन प्रचार करणं शक्य होणार आहे.
भाजपाच्या कामांची माहिती देताना, दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचं सरकार कसं अपयशी ठरलं, हे सांगण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. दिल्ली-एनसीआर भागात फिरणाऱ्या या डिजिटल रथामध्ये वायफायची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे हा रथ जिथे जाईल, त्या भागात लोकांना फ्री वायफायचा वापर करता येईल. या वायफायच्या पासवर्डमधून भाजपानं केजरीवालांवर निशाणा साधला आहे. भाजपानं वायफायचा पासवर्ड 'Kejriwal failed to give free WiFi' असा ठेवला आहे.
डिजिटल रथावरील वायफायचा वापर लोकांना अगदी मोफत करता येईल, अशी माहिती दिल्ली भाजपाच्या आयटी आणि सोशल मीडियाचे प्रभारी नीलकंठ बक्षी यांनी दिली. 'या वायफायच्या माध्यमातून लोकांना मोदी आणि त्यांच्या कामाची माहिती सोशल मीडियावरुन शेअर करता येईल,' असंदेखील ते पुढे म्हणाले. एकाचवेळी 200 लोकांना फ्री वायफायचा वापर करता येऊ शकेल. 1 एप्रिलपासून हा डिजिटल रथ दिल्लीच्या रस्त्यांवर धावेल, असं बक्षी यांनी सांगितलं.