कपिल पाटलांच्या मंत्रिपदामुळ भिवंडीत भाजपाचे वर्चस्व वाढले, काँग्रेस, शिवसेनेसमोर तगडे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 05:16 PM2021-07-13T17:16:54+5:302021-07-13T17:18:02+5:30
Kapil Patil News; खा.कपिल पाटील यांची केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर ठाणे जिल्ह्यासह भिवंडी लोकसभा मतदार संघावर आता भाजपचे वर्चस्व निर्माण झाले आहे.
- नितिन पंडीत
भिवंडी - केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सोमवारी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारली. याप्रसंगी देशभरातील तळागाळातील व दुर्गम भागातील ग्रामस्थांपर्यंत केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना पोचविण्याचा निर्धार पाटील यांनी व्यक्त केला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी आपण कार्य करणार असल्याचे त्यांनी पाटील यांनी यावेळी नमूद केले. केंद्रीय राज्यमंत्रीपदाची खासदार कपिल पाटील यांनी ७ जुलै रोजी शपथ घेतली होती. खा.कपिल पाटील यांची केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर ठाणे जिल्ह्यासह भिवंडी लोकसभा मतदार संघावर आता भाजपचे वर्चस्व निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला शह देण्यासाठीच खा कपिल पाटील यांना केंद्राने ताकद दिल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
कपिल पाटील यांचीकेंद्रीयमंत्रीपदी वर्णी लागल्याने ठाणे जिल्ह्याबरोबरच खा कपिल पाटील हे नेतृत्व करीत असलेल्या भिवंडी लोकसभा मतदार संघावर देखील आता भाजपचे वर्चस्व राहणार असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. कारण खा.कपिल पाटील यांच्याशी राजकीय मुकाबला करणारा एकही चेहरा सध्या तरी काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेकडे नाही. त्यातच खा. कपिल पाटील यांचे कट्टर राजकीय शत्रू मानले जाणारे जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य व बांधकाम समिती सभापती सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी शिवसेनेच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. सुरेश म्हात्रे यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेनेकडे देखील ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागा बरोबरच भिवंडी लोकसभा मतदार संघात कपिल पाटील यांचा राजकीय मुकाबला करणारा चेहरा नाही. तसेच यापूर्वी भिवंडी लोकसभा मतदार संघ हा मुस्लिम बहुल मतदार संघ असल्याने आतापर्यंत या मतदार संघावर काँग्रेसचे वर्चस्व होते मात्र २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून हा मतदार संघ भाजपचे खा कपिल पाटील यांनी जिंकला असून आता ते थेट केंद्रीय मंत्री झाले आहेत. त्यामुळे सध्या तरी त्यांचा राजकीय मुकाबला करणारा चेहरा काँग्रेसकडे नसल्याने काँग्रेससाठी आगामी लोकसभा निवडणुकीत मोठे आव्हान ठरणार आहे. त्यातच काँग्रेस , राष्ट्रवादी व शिवसेना या तिन्ही पक्षांकडे सध्या तरी तसा उमेदवार अथवा चेहरा नाही. त्यामुळे भिवंडी लोकसभा मतदार संघात भाजपचाच बोलबाला राहणार यात सुतमात्र शंका नाही.
महाविकास आघाडीला जर खा कपिल पाटील यांचा राजकीय अश्व थोपवायचे असेल तर काँग्रेस , राष्ट्रवादी व शिवसेना या तिन्ही पक्षांना एकत्र येऊनच किमान भिवंडी लोकसभा मतदार संघाची निवडणूक लढवीने गरजेचे होणार असून केंद्रीय मंत्री असलेल्या खा.कपिल पाटील यांच्या समोर उमेदवार द्यायचे झाल्यास त्या उमेदवाराला देखील महाविकास आघाडीने राजकीय ताकद देणे गरजेचे होणार आहे. अन्यथा केंद्रीय मंत्री असलेल्या कपिल पाटील यांच्या समोर सामान्य उमेदवाराचा टिकाव लागणार नाही असे मत देखील राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत. त्यामुळे भिवंडी लोकसभा मतदार संघात सध्यातरी भाजपचाच बोलबाला असून भाजप आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी मोठी राजकीय ताकद लावणार यात देखील शंका नाही. त्यामुळे काँग्रेससह महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली असून महाविकास आघाडी यातून नेमकी कशी तोडगा काढणार हे येणार काळच ठरवणार आहे.