J. P. Nadda : गोव्यात भाजपाचा चेहरा प्रमोद सावंतच - जे. पी नड्डा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 10:52 PM2021-07-25T22:52:00+5:302021-07-25T23:19:39+5:30
J. P. Nadda : केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री दिल्लीहून स्थानिक राजकारणात येणार अशी चर्चा गेले काही दिवस आहे. गोवा दौऱ्यावर असताना नड्डा यांनी पत्रकार परिषद घेतली.
पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात यशस्वी वाटचाल सुरू आहे. केंद्रात श्रीपाद नाईक चांगली कामगिरी बजावत आहेत, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा म्हणाले. २0२२ ची आगामी विधानसभा निवडणूक गोव्यात भाजप सावंत यांच्या नेतृत्त्वाखालीच लढणार हे यातून स्पष्ट झाले.
केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री दिल्लीहून स्थानिक राजकारणात येणार अशी चर्चा गेले काही दिवस आहे. गोवा दौऱ्यावर असताना नड्डा यांनी पत्रकार परिषद घेतली. तेव्हा श्रीपाद यांना दिल्लीहून स्थानिक राजकारणात आणणार का?, या प्रश्नावर त्यांनी वरील उत्तर दिले. कोणीही काहीही इच्छा प्रकट केली, तरी निर्णय पक्षाने घ्यायचा असतो. श्रीपाद दिल्लीत चांगले काम करत आहेत, असे ते म्हणाले.
गेले दोन दिवस गोवा दौऱ्यावर असलेले नड्डा यांनी आमदार, मंत्री, खासदार, राज्य कार्यकारणी सदस्य, पक्षाची कोअर टी. मंडलल अध्यक्ष तसेच युवा मोर्चा, महिला मोर्चा, आदी विविध आघाड्यांचे अध्यक्ष यांच्याशी चर्चा केली. पत्रकार परिषदेस मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, पक्षाचे गोवा प्रभारी सी. टी. रवी, प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे तसेच इतर उपस्थित होते.
मी आशावादी आहे...
गोव्यात भाजपा आणखी वाढेल आणि पक्षाची उत्तरोत्तर प्रगती होईल याबाबत मी आशावादी आहे, असे ते म्हणाले. नड्डा म्हणाले की, २०१७ च्या तुलनेत गोव्यात आज २०२१ मध्ये भाजप पक्ष कितीतरी पटींनी वाढला आहे. राज्यात भाजपा सरकारकडून बऱ्यापैकी काम चालले आहे. कोविड महामारी व्यवस्थापन हाताळताना भाजपा सरकारने बरीच विकासकामेही केली. २०२१ पर्यंत मोपा येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम पूर्ण होईल. गोव्यात 'फार्मा हब' स्थापन करण्यासाठीही राज्य सरकारचे प्रयत्न चालू आहेत. गोव्यात पक्षाच्या कामगिरीबद्दल मी समाधानी आहे. राज्यात पक्ष पूर्ण ताकदीने उभा आहे.
कर्नाटकात पेचप्रसंग नाहीच, येडियुराप्पांची चांगली कामगिरी
कर्नाटकमध्ये भाजपचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा चांगले काम करीत असल्याचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी गोवा भेटीवर असताना पत्रकार परिषदेत सांगितले. कर्नाटकात नेतृत्त्वबदल होणार असे वृत्त गेले काही दिवस आहे. येडियुराप्पा यांनीही स्वत: तसे संकेत दिले होते. परंतु नड्डा यांनी एका प्रश्नावर कर्नाटकात कोणताही पेचप्रसंग नसल्याचे सांगितले. केवळ प्रसार माध्यमांनाच पेचप्रसंग दिसतो, असे नड्डा म्हणाले.