पदवीधर निवडणुकीतील नाराजीनं वाढली भाजपाची डोकेदुखी; आणखी एक मित्रपक्ष दुखावला
By प्रविण मरगळे | Published: November 18, 2020 09:05 AM2020-11-18T09:05:36+5:302020-11-18T09:07:55+5:30
Aurangabad Graduate Constituency, BJP News: पुणे पदवीधर निवडणुकीतून रयत क्रांती संघटनेने या निवडणुकीतून माघार घेतली, परंतु मराठवाडा पदवीधर मतदारसंघात भाजपामधील नाराजी उफाळून आली.
मुंबई – विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर अशा ५ जागांसाठी येत्या १ डिसेंबरला निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशी थेट लढत होणार आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक असल्याने भाजपा आणि महाविकास आघाडीचं भवितव्य या निवडणुकीच्या निकालावर ठरणार आहे. मात्र निवडणुकीआधीच भाजपाच्या मागे डोकेदुखी वाढत आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघातून मित्रपक्ष रयत क्रांती संघटनेने उमेदवार उभा केला होता, परंतु भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मध्यस्थीने सदाभाऊ खोत यांची समजूत काढण्यात यश आलं. पुणे पदवीधर निवडणुकीतून रयत क्रांती संघटनेने या निवडणुकीतून माघार घेतली, परंतु मराठवाडा पदवीधर मतदारसंघात भाजपामधील नाराजी उफाळून आली. पदवीधर निवडणुकीत तिकीट नाकारल्याने माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांनी थेट पक्षाला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचं जाहीर केले.
दुसरीकडे भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसंग्रामनेही आता नाराजी व्यक्त केली आहे. भाजपा शिवसंग्रामला विचारात घेत नसून पक्षाच्य काही नेत्यांना मराठवाड्याची जागा पाडायची आहे का? असा सवाल विनायक मेटेंनी केला. तसेच याबाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण द्यावं, येत्या २५ तारखेपर्यंत शिवसंग्रामला विचारात न घेतल्यास स्वतंत्र निर्णय घेऊ असा इशाराही विनायक मेटेंनी दिला आहे. त्यामुळे आधीच बंडखोरी आणि नाराजीचा सामना करणाऱ्या भाजपासमोर आणखी एक डोकेदुखी निर्माण झाली आहे.
उमेदवारी अर्ज मागे
जयसिंगराव गायकवाड सध्या भाजपच्या प्रदेश कार्यसमितीचे सदस्य होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ते सक्रिय राजकारणातून बाजूला फेकले गेले होते. आता होऊ घातलेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपकडून शिरीष बोराळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे नाराज जयसिंगराव गायकवाड यांनी मराठवाडा विभागातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आज अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असताना त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. मात्र, त्यासोबतच भाजपाला रामरामही ठोकला. दरम्यान, महाविकास आघाडीमुळे ही निवडणूक भाजपला अवघड जाण्याची शक्यता आहे.