भाजपच्या थापा! इंदापूर तालुक्यातील चाळीस ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीची सत्ता; दत्तात्रय भरणेंचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 07:20 PM2021-02-10T19:20:08+5:302021-02-10T19:21:00+5:30
NCP Gram panchayat Indapur: विरोधकांच्या थापाकडे नागरिकांनी लक्ष देऊ नये : राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून सर्व ग्रामपंचायतींना भरीव विकास निधी देणार
इंदापूर : इंदापूर तालुक्यातील साठ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडी नुकत्याच पार पडल्या, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराच्या ४० ग्रामपंचायती व २ संमिश्र वर्चस्व निर्माण झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून अखंड सुरू असलेल्या विकास कामावर तालुक्यातील तमाम जनतेचा विश्वास असल्यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेसमय इंदापूर तालुका झाला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
सर्वसामान्य जनतेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या विचारसरणीतून इंदापूर तालुक्यामध्ये कामकाज सुरू आहे. सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून झोपडीतील माणसाचा विकास व न्याय देण्याची भूमिका सातत्याने असल्यामुळे, प्रत्येक गावापर्यंत शासनाच्या विविध योजनेचा निधी पोहोचलेला असून विकास पोचला आहे. इंदापूर तालुक्यातील विरोधक हे जनतेची दिशाभूल करण्यासाठी, इतक्या ग्रामपंचायती आमच्या विचाराच्या आल्या. आशा चुकीच्या बातम्या पसरवू लागले आहेत. परंतु ज्या साठ ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या, यामध्ये तब्बल ४० ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व झाले आहे. तर दोन ग्रामपंचायती संमिश्र आले आहेत. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती च्या विकासासाठी मी कटिबद्ध असून गावातील रस्ते पिण्याचे पाणी वीज या मूलभूत सुविधा प्रत्येक गावाला दिल्या जातील. त्यामुळे तालुक्यातील कोणताही नागरिक, विरोधकांच्या भूल थापांना कधीही फसत नाही. असाही विश्वास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांचे सातत्याने लक्ष इंदापूर तालुक्यावर, असल्यामुळे तालुका पुणे जिल्ह्यामध्ये विकास कामात पुढे राहिला आहे. दळणवळणासाठी महत्त्वाचे समजले जाणारे रस्ते अद्यावत होत आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांचा उपेक्षित असलेल्या पाणीप्रश्न मार्गी लागत आहे. पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून मिळणारे पाणी जास्तीचे मिळणार आहे, हा चाललेला विकासाचा महापुर विरोधकांना देखवत नाही. अशी टीका राज्यमंत्री भरणे यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता केली.
मी कधीही खोटे बोलत नाही.जे बोलायचे ते विकास कामातून बोलून दाखवतो. मात्र विरोधकांना काहीच हातात काम नसल्यामुळे, खोटे बोलून दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे.हा प्रयत्न अक्षरश: नुकत्याच झालेल्या इंदापूर तालुक्याच्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये, नागरिकांनी नाकारला आहे अशीही टिका राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली.