शेट्टींना सोबत घेण्याच्या भाजपाच्या हालचाली
By यदू जोशी | Published: March 14, 2019 04:17 AM2019-03-14T04:17:52+5:302019-03-14T04:18:27+5:30
पुण्यात झाली गुप्त बैठक; पुढील निर्णय शिवसेनेवर अवलंबून
- यदु जोशी
मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी भाजपा-शिवसेना युतीसोबत यावे यासाठी जोरदार हालचाली सुरु झाल्या असून भाजपाने शेट्टी यांच्याशी संपर्क साधला आहे. त्यासाठी मंगळवारी पुण्यात एक गुप्त बैठक झाली. आता शिवसेनेने हातकणंगलेची जागा सोडली तर शेट्टी एनडीएमध्ये परततील, असे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
मुख्यमंत्री कार्यालय आणि भाजपा यांच्यात समन्वयासाठी असलेले मुख्यमंत्र्यांचे ओएसडी श्रीकांत भारतीय यांनी राजू शेट्टी आणि त्यांच्या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांची काल पुण्यात बैठक झाली. शेट्टी यांनी परत युतीसोबत यावे, असा प्रस्ताव त्यांना देण्यात आला.
२०१४ मध्ये शेट्टी यांना भाजपा-शिवसेनेने पाठिंबा दिला होता आणि ते हातकणंगलेमधून मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते. युतीमध्ये मूळ ही जागा शिवसेनेकडे आहे. शिवसेनेच्या कोट्यातून ती शेट्टी यांना देण्यात आली होती. त्यामुळे यावेळी शेट्टी यांना पुन्हा पाठिंबा द्यायचा तर शिवसेनेकडून ती जागा घ्यावी लागेल. शिवसेनेने माजी खासदार निवेदिता माने यांचे पुत्र धैर्यशील माने यांना पक्षात घेऊन त्यांची उमेदवारी जवळपास नक्की केली आहे.
आता शक्यता अशी आहे की शेट्टी यांनी युतीसोबत येण्याची तयारी दर्शविली तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे शब्द टाकतील. ठाकरे यांच्या निर्णयावर शेट्टींचे युतीसोबत परतणे अवलंबून असेल. पुण्यातील बैठकीबाबत विचारले असता श्रीकांत भारतीय यांनी मात्र अशी बैठक झाल्याचा इन्कार केला. मात्र, शेट्टी यांना युतीसोबत आणण्याचे प्रयत्न होत असल्याच्या वृत्ताला भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने दुजोरा दिला.
पुण्यात बापट यांचा पत्ता कट?
पुणे लोकसभा मतदारसंघात अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट हे भाजपाचे उमेदवार नसतील, हे स्पष्ट झाले आहे. कारण, भाजपा-शिवसेनेने राज्यातील लोकसभा मतदारसंघांसाठी जे समन्वयक नेमले आहेत त्यात पुण्यासाठी भाजपातर्फे गिरीश बापट तर शिवसेनेतर्फे आ.डॉ.नीलम गोºहे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. कोणत्याही उमेदवाराला अशी जबाबदारी दिली जात नाही.