वडिलांच्या पुण्याईवर दोन्ही उमेदवारांची भिस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 04:41 AM2019-04-16T04:41:38+5:302019-04-16T04:42:03+5:30

भाजपतर्फे विद्यमान खासदार पूनम महाजन पुन्हा रिंगणात आहेत.

Both of the candidates are confident of their father's work | वडिलांच्या पुण्याईवर दोन्ही उमेदवारांची भिस्त

वडिलांच्या पुण्याईवर दोन्ही उमेदवारांची भिस्त

Next

- खलील गिरकर
भाजपतर्फे विद्यमान खासदार पूनम महाजन पुन्हा रिंगणात आहेत. पक्षाचे दिवंगत नेते, माजी केंद्रीय मंत्री प्रमोद महाजन यांच्या त्या कन्या. भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून त्या कार्यरत आहेत. मोदी लाटेत गेल्या निवडणुकीत एक लाख ८६ हजारांच्या मताधिक्याने त्यांनी विजय मिळविला. मात्र, नंतरच्या काळात त्यांचा मतदारांशी संपर्क तुटल्याचा मुद्दा वारंवार चर्चेत आला. त्यांचे मतदारंसघाकडे, त्याच्या बांधणीकडे लक्ष नाही. त्याचा फटका त्यांना बसू शकतो, अशी टीकाही त्यांच्यावर झाली. सध्या शिवसेनेशी खास करून युवा सेनेशी त्यांचा खटका उडाल्याचा मुद्दा चर्चेत होता. यापूर्वी या मतदारसंघातून लढलेल्या माजी खासदार प्रिया दत्त यांनाच काँग्रेसने पुन्हा संधी दिली आहे. मात्र, गेल्या निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी या मतदारसंघाकडे पाठ फिरविली. यंदा त्या निवडणूक लढविणार नाहीत, अशी चर्चा होती. मात्र, आयत्यावेळी पक्षातर्फे पुन्हा त्यांनाच गळ घालण्यात आली. त्यांचे वडील सुनील दत्त यांना मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघात आहे. त्यांच्या पाठबळावर त्यांची भिस्त आहे, तसेच पूनम महाजन यांच्याविरुद्धच्या नाराजीचा फायदा मिळेल, असा विश्वास दत्त यांच्या समर्थकांना वाटतो.


>मतदारसंघाशी पुरेसा संपर्क नसल्याचा आक्षेप तुमच्याबद्दल आहे?
माझ्याविरुद्ध हा चुकीचा आरोप केला जातो आहे. मी मतदारसंघातील सर्वसामान्य मतदारांशी कायम संपर्कात राहिले. भाजपची सत्ता केंद्र व राज्यात असल्याने त्या सरकारच्या कामगिरीचा लाभ मतदारसंघातील तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी मी सातत्याने कार्यरत राहिले. मतदार मतदानाच्या माध्यमातून त्याला प्रतिसाद देतील, असा विश्वास आहे.

>पुन्हा निवडून आल्यानंतर कोणत्या समस्या सोडविणार आहात?
मतदारसंघातील अनेक महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावण्यात आले आहेत. काही प्रश्न प्रलंबित राहिले असले, तरी त्यांची सोडवणूक करण्यासाठी पुन्हा नव्याने प्रयत्न करण्यात येतील व मतदारसंघाला आणखी आधुनिक करण्याचा प्रयत्न करणार.
>मागील लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर तुम्ही या मतदारसंघात फारशा सक्रिय राहिल्या नाहीत व तुमचा संपर्क तुटल्याचा आरोप केला जातो, याबाबत काय म्हणणे आहे?
निवडणुकीतील पराभवानंतर मी माजी खासदार होते. त्यामुळे मतदारसंघात सक्रिय नव्हते, हा आरोप मुळातच चुकीचा आहे. माजी खासदार म्हणून मी कार्यरत होते.
>राजकीय संपर्क तुटल्याचा परिणाम होण्याची भीती आहे?
मी सामाजिक कार्यात
सक्रिय होते. या मतदारसंघातील नागरिकांशी माझा संपर्क
होता. तरुणाई, सामाजिक कार्यकर्ते माझ्या संपर्कात
होते. माझे काम नियमितपणे
सुरू होते. त्यामुळे ही भीती निराधार आहे. मला माझ्या कामांची पावती मिळेल व
मला विजय मिळेल, असा
विश्वास आहे.
>खासदार म्हणून निवडून आल्यानंतर मतदारसंघातील
नेमकी कोणती प्रमुख कामे मार्गी लावली?
संरक्षण दलाच्या जमिनीवर वास्तव्य करत असलेल्या नागरिकांच्या कायमस्वरूपी निवासस्थानाचा प्रश्न सोडविला आहे. कब्जे हक्काच्या सरकारी जमिनी मालकी हक्कामध्ये रूपांतरित करण्यासाठी पूर्वीचा २५ टक्के प्रीमियम १० टक्क्यांवर आणला आहे. मतदारसंघात १,४२८ सार्वजनिक शौचालये तयार करण्यात आली आहेत. विमानतळाच्या परिसरातील झोपडीधारकांना घरे देण्यात आली आहेत. माझ्या खासदार निधीचा मी १०० टक्के वापर केला आहे. त्याचे परिणाम दिसत आहेत.
>तुम्ही आधी उमेदवारीला नकार आणि नंतर होकार दिला. शेवटच्या क्षणी मतदारांचा पाठिंबा मिळेल का?
मी या मतदारसंघात यापूर्वी खासदार म्हणून काम केले आहे. माझ्या कामाबाबत मतदारांना माहिती आहे. २०१४ प्रमाणे यावेळी कोणतीही लाट नाही. लोकांमध्ये विद्यमान खासदार व सरकारच्या धोरणांबाबत नाराजी आहे. विकासाच्या नावावर केवळ घोषणाबाजी करण्यात आल्याचे मतदारांना कळून चुकले आहे. त्याचा फायदा मिळेल. ज्यांना पक्षाबाहेर जायचे होते ते पूर्वीच गेले, हेही बरे झाले. कुणाच्या जाण्यामुळे पक्ष संपत नाही. त्यांची जागा घेण्यास नव्या दमाचे कार्यकर्ते तयार झाले आहेत.
>युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आदित्य ठाकरेंच्या छायाचित्रावरून असहकार्याची भूमिका घेतली होती. शिवसेनेचे सहकार्य कसे आहे?
शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा व पूर्ण सहकार्य मिळते आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सहकार्याचे आश्वासन दिले आहे. त्यांच्यासह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते या मतदारसंघातील प्रचारात सक्रिय आहेत.
>मतदारसंघातील कोणता प्रश्न कळीचा वाटतो? झोपडीधारकांचा प्रश्न सोडविल्याचा दावा पूनम महाजन यांनी केला आहे...
माझ्या मतदारसंघात एकीकडे सेलिब्रेटी-उच्चभ्रू तर दुसरीकडे झोपडीधारक मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांना न्याय देण्याचा माझा प्रयत्न राहील. विमानतळ परिसरातील झोपडीधारकांना घरे देण्याचा निर्णय रेंगाळत ठेवून निवडणुकीच्या तोंडावर घाईने घेण्यात आला आहे. त्यात अनेकांवर अन्याय झाला आहे.

Web Title: Both of the candidates are confident of their father's work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.