"हिंमत असेल तर अनाधिकृत क्लब अन् हॉटेल तोडून दाखवा"; मंत्री जितेंद्र आव्हाडांचं आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 10:26 AM2020-10-31T10:26:33+5:302020-10-31T10:28:01+5:30

Jitendra Awhad News: मीरा भाईंदर शहर हे एका व्यक्तीच्या किंवा एका पक्षाच्या मालकीचे नाही आहे अशा शब्दात मंत्री जितेंद्र आव्हाडांनी माजी आमदार नरेंद्र मेहतांवर निशाणा साधला.

Break up unauthorized clubs and hotels if you have the courage; Challenge of Minister Jitendra Awhad | "हिंमत असेल तर अनाधिकृत क्लब अन् हॉटेल तोडून दाखवा"; मंत्री जितेंद्र आव्हाडांचं आव्हान

"हिंमत असेल तर अनाधिकृत क्लब अन् हॉटेल तोडून दाखवा"; मंत्री जितेंद्र आव्हाडांचं आव्हान

Next
ठळक मुद्देमाजी आमदाराच्या विरोधात विधानसभेत सर्वात जास्त मोठ्याने आवाज मी उठवलामाझ्याकडे १२४ अनधिकृत हॉटेलची यादी जाहीर करतो हिंमत असेल तर त्यातील २४ तोडून दाखवावी.कोणाला खुश करण्यासाठी आयुक्त जर काम करत असतील तर गाठ आमच्याशी आहे

मीरारोड - आयुक्त डॉ. विजय राठोड तुम्ही खूप प्रामाणिक व कर्तव्य कठोर आहात तर माजी आमदाराचा क्लब व हॉटेल तोडा, आमच्या कार्यकर्त्याचे हॉटेल अनधिकृत म्हणून कोणाला खुश करण्यासाठी तीन वेळा तोडले. मी १२४ अनधिकृत हॉटेलांची यादी जाहीर करतो त्यातली २४ हॉटेल तरी तोडायची तरी हिंमत दाखवा असे थेट आव्हान गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मीरारोड येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात दिले. 

मीरा भाईंदर शहर हे एका व्यक्तीच्या किंवा एका पक्षाच्या मालकीचे नाही आहे. माजी आमदार नरेंद्र मेहतांचे नाव न घेता आव्हाड म्हणाले की, येथील माजी आमदाराच्या विरोधात विधानसभेत सर्वात जास्त मोठ्याने आवाज मी उठवला. मी आयुक्तांना जाहीरपणे सांगतो, माजी आमदाराच्या ७११ क्लब, सी एन रॉक हॉटेलवर कारवाई करा, तुम्ही खूप प्रामाणिक आहात आणि कर्तव्य कठोर आहात तर ती बांधकामे तोडा असं त्यांनी सांगितले.  परंतु कोणाची त्यावर कारवाई करण्याची आणि बोलण्याची हिंमत नाही. आमच्या एका  कार्यकर्त्याचे हॉटेल ३ वेळा तोडले. माझ्याकडे १२४ अनधिकृत हॉटेलची यादी जाहीर करतो हिंमत असेल तर त्यातील २४ तोडून दाखवावी. कोणाला खुश करण्यासाठी आयुक्त जर काम करत असतील तर गाठ आमच्याशी आहे असा इशारा आव्हाडांनी दिला. 

पालिकेतील अधिकारी एका पक्षाचे असल्यासारखे वागतात. कोण अधिकारी काय करतोय किती वर्ष कुठल्या पदावर बसून आहे, कशात भ्रष्टाचार झाला आहे याची संपूर्ण यादी आम्ही खिशात ठेऊन फिरत असतो. आम्हाला आमचे काम करू द्या तुमची तुमचे काम करा. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा गळा दाबण्याचा प्रयत्न झाला तर त्याचे प्रत्युत्तर दिले जाईल, आम्ही वेडीवाकडी कामे सांगणार नाही, आम्ही रस्त्यावर कार्यालये बांधणार नाही, आम्ही सोसायटींची जागा ताब्यात घेणार नाहीत असे आव्हाड म्हणाले. 

शहर जिल्हाध्यक्ष संतोष पेंडुरकर यांनी पदाधिकाऱ्यांची संख्या सांगितली असता त्याची बेरीज करत तुम्ही सांगता तितके पदाधिकारी येथे उपस्थित नाहीत. त्यामुळे आपणच आपल्याला स्वतःला फसवायचे नाही असे खडे बोल जितेंद्र आव्हाडांनी सुनावले . जे गेले ,  त्यांना कोणी पाठवले हा इतिहास आहे. पण जे राहिले त्यांच्या प्रामाणिक पणाच्या बळावर पक्ष बळकट करायचा आहे असे ते म्हणाले. या मेळाव्यास ठाणे जिल्हाध्यक्ष माजी खासदार आनंद परांजपे यांनीही नरेंद्र मेहता यांच्यावर निशाणा साधला, गेल्या ५ - ७  वर्षात शहर विकासाच्या नावाखाली तत्कालीन आमदार नरेंद्र मेहतांनी स्वतःचा विकास केला. लोकांनी त्यांना अद्दल घडवून घरी बसवले . पण आजही महापालिकेतील कार्यालये मेहता खासगी कार्यालयासारखी वापरत आहेत अशी टीका परांजपेंनी केली. या मेळाव्यास संतोष धुवाळी, माजी उपनगराध्यक्ष अरुण कदम, माजी सभापती मोहन पाटील, युवा आधाडीचे शहर अध्यक्ष साजिद पटेल आदी उपस्थित होते. 

सिमेंट रस्त्यांचे ठेके आणि कामांची चौकशी लावणार 

मीरा भाईंदर मधील सिमेंट रस्त्यांचे ठेके कोट्यावधी रुपयांनी वाढवून दिले असतानाच कामे रखडली आणि ती निकृष्ठ असल्या बाबतचे सविस्तर वृत्त लोकमतने दिले होते. त्यातील सविस्तर माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संतोष पेंडुरकर यांनी मांडली. सदर प्रकार ऐकून आव्हाड यांनी, यात शंभर टक्के भ्रष्टाचार झालेला आहे.  तुम्ही स्थानिक आमदारांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वाना याच्या तक्रारी करा . माझ्याकडे पण प्रत द्या . या कामांची चौकशी लावू असे आश्वासन आव्हाडांनी दिले. 

 

Web Title: Break up unauthorized clubs and hotels if you have the courage; Challenge of Minister Jitendra Awhad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.