"पुलाचे उद्घाटन झाले आता 'छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल' असे नामकरण कधी?"; भाजपाचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 02:44 PM2021-08-02T14:44:35+5:302021-08-02T14:48:40+5:30
Mumbai News : 'छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल' असे नामकरण करण्यासाठी स्थानिक खासदार मनोज कोटक यांनी ९ डिसेंबर २०२० ला प्रस्ताव दिला होता, आणि आठ महिन्यानंतर अद्यापही हा प्रस्ताव महापालिकेतच प्रलंबित आहे.
मुंबई - एम पूर्व विभागातील वीर जिजामाता मार्गावरील उड्डाणपुलाचे लोकार्पण काल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. सदर पुलाचे 'छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल' असे नामकरण करण्यासाठी स्थानिक खासदार मनोज कोटक यांनी ९ डिसेंबर २०२० ला प्रस्ताव दिला होता, आणि आठ महिन्यानंतर अद्यापही हा प्रस्ताव महापालिकेतच प्रलंबित आहे.
मोठा गाजावाजा करत सत्ताधारी शिवसेनेने काल पुलाचे उदघाटन केले. मात्र या पूलावर बसवण्यात आलेल्या नामकरण कोनशिलेवर राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे नाव आहे; परंतू छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव शिवसेना सत्ताधारी उड्डाणपुलास देऊ शकली नाही ही बाब निश्चितच समस्त महाराष्ट्रासाठी अत्यंत वेदनादायी आहे. या उड्डाणपुलाचे उदघाटन झाले मात्र नामकरण कधी? असा सवाल भाजपा खासदार मनोज कोटक यांनी केला आहे.
सहा किलोमीटर लांब घाटकोपर मानखुर्द जोडमार्गाचे नामकरण 'वीर जिजामाता भोसले मार्ग' असे महापालिकेच्या ठरावाद्वारे करण्यात आले आहे. परंतू या संपूर्ण सहा किलोमीटरच्या रस्त्यावर एकाही ठिकाणी 'वीर जिजामाता भोसले मार्ग' असा नामफलक लावलेला नाही हे ही दुर्दैव आहे अशी खंत भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे यांनी व्यक्त केली.
महापालिकेतील शिवसेनेच्या नेत्यांना किमान छत्रपती शिवाजी महाराज, वीर जिजामाता भोसले यांच्यासारख्या महाराष्ट्राच्या आराध्य दैवतांच्या नामकरणाबाबत तसेच त्यांच्या नामफलकाबाबत तातडीने कार्यवाही करण्याची सुबुद्धी देवो अशी भावना भाजपा नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी व्यक्त केली.
"महाविकास आघाडी सरकारने विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत आपण किती उदासीन आहोत हेच दाखवून दिलं" #BJP#KeshavUpadhye#uddhavThackeray#politics#12thResults#Maharashtrahttps://t.co/d9ShpKVhoxpic.twitter.com/cNdOzGIej2
— Lokmat (@MiLOKMAT) August 1, 2021