बुलडाण्यात आघाडी अन् युतीचे त्रांगडे, १५ वर्षांपासून सेनेचा झंझावात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 05:48 AM2019-01-24T05:48:29+5:302019-01-24T05:48:51+5:30
कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बुलडाणा लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेने वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
- नीलेश जोशी
बुलडाणा- कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बुलडाणा लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. राखीव असलेला बुलडाणा मतदारसंघ खुला झाल्यानंतर काँग्रेस-राष्टÑवादी आघाडीत हा मतदार संघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आला. मात्र दोन्ही वेळा राष्ट्रवादीचा उमेदवार पराभूत झाला. सध्यातरी आघाडी आणि युतीच्या जागा वाटपाचे त्रांगडे निर्माण झाले असून हा गुुंता सुटल्यावरच लढतीचे संभाव्य चित्र स्पष्ट होणार आहे.
शिवसेनेचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांनी सर्कल मेळाव्याच्या माध्यमातून जनसंपर्क सुरू केला आहे. तर परिवर्तनाची हाक देत राष्ट्रवादीनेही जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून काढले आहे. सेना आणि राष्टÑवादी असा सामना पुन्हा होण्याची चिन्हे आहेत. गेल्या दहा वर्षापासून प्रतापराव जाधव येथे खासदार आहेत. युती झाली तर तेच उमेदवार असतील; मात्र युती झाली नाही तर त्यांना काँग्रेस आघाडीसह, भाजपासोबत लढत द्यावी लागणार आहे. युती न झाल्यास भाजपाकडून जळगाव जामोदचे आ. डॉ. संजय कुटे किंवा जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे यांना उमेदवारी मिळू शकते. मात्र जिल्ह्याची राजकीय स्थिती पाहता भाजपाशी युतीशिवाय सेनेला ही जागा जिंकता येणे कठीण आहे. खा. जाधव यांच्या विरोधात जाणारा ‘अॅन्टी इनकम्बन्सी’ फॅक्टर राष्टÑवादीच्या पथ्थ्यावर पडणारा आहे. त्यामुळेच खुद्द शरद पवार यांनी या जागेचा हट्ट धरला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही या मतदारसंघावर काँग्रेसचा दावा सांगितला आहे. काँग्रेसला जागा मिळाली, तर आ. हर्षवर्धन सपकाळ, आ. राहुल बोंद्रे हे उमेदवारीचे प्रमुख दावेदार असतील. आ.हर्षवर्धन सपकाळ विरोधातील एक गट त्यांना उमेदवारी मिळू नये, म्हणून प्रयत्नशील आहे. त्यामुळे काँग्रेसला जागा मिळाली तर गटबाजीचा फटका बसू शकतो.
राष्ट्रवादी काँग्रेसकडे डॉ. राजेंद्र शिंगणेंच्या रूपाने उमेदवार असला तरी जिल्ह्यात काँग्रेसचे नेटवर्क मोठे आहे. त्यामुळे काँग्रेसला विश्वासात घेऊच राष्टÑवादीला लढाईत उतरावे लागणार आहे. दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्यासाठी बुलडाण्याची जागा प्रतिष्ठेची केली आहे. प्रसंगी ही जागा मिळाली नाही तर आघाडीबाबत विचार करावा लागले, अशी भूमिकाच खा. राजू शेट्टी यांनी घेतलेली आहे. त्यामुळे महाआघाडीतील जागा वाटपाचा गुंता सुटल्याशिवाय या मतदारसंघातील चित्र स्पष्ट होणार नाही. अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने या जागेसाठी अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे आ. बळीराम शिरस्कार यांचे नाव जाहीर केले आहे. लहान-मोठ्या सर्वच पक्षांचा या मतदारसंघावर डोळा असला तरी, जोपर्यंत युती आणि आघाडीचे नक्की ठरत नाही, तोपर्यंत खरे चित्र स्पष्ट होणार नाही.
>सध्याची परिस्थिती
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होऊन हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटला तर डॉ. राजेंद्र शिंगणे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याचा निकटवर्तीयांचा दावा आहे. डॉ.शिंगणे यांना यापूर्वी खा.जाधव यांच्याशी लढताना पराभवाचा सामना करावा लागला होतो. त्यामुळे शिंगणे यांनी सध्या जनसंपर्क वाढविला आहे. काँग्रेसला मतदारसंघ सुटावा यासाठी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आग्रही असून जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थामधील जनाधार हा काँग्रेसच्या पारड्यात आहे. त्यामुळे पक्षीय पातळीवर जिल्ह्यात काँग्रेस मजबूत स्थितीत आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या चर्चेच्या अंतिम फेरीत याबाबत काय निर्णय होतो यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत.शिवसेनेतील अंतर्गत वाद अन् विद्यमान खासदारांबाबत असलेला अॅन्टी इनकम्बन्सी फॅक्टर सेनेला यावेळी अडचणीत ठरणार असल्याची चर्चा आहे. युती झाली नाही तर भाजपा स्वतंत्रपणे लढण्याची तयारी करीत आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही महाआघाडीत या जागेवर दावा कायम ठेवला आहे.