मोठी बातमी! मुंडे समर्थक १४ भाजपा पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; प्रीतम मुंडेंना मंत्रिपद न दिल्यानं नाराज
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 04:35 PM2021-07-10T16:35:24+5:302021-07-10T16:37:23+5:30
Narendra Modi Cabinet Reshuffle: प्रीतम मुंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश न केल्याने भाजपातील मोठा गट नाराज असल्याचं बोललं जात आहे.
बीड – केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर भाजपात नाराजीचे पडसाद उमटले आहेत. बीडमधील १४ भाजपा पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या प्रीतम मुंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने मुंडे समर्थक मोठ्या प्रमाणात नाराज आहेत. पंकजा मुंडे यांनी जाहीर पत्रकार परिषद घेत पक्षाचा निर्णय पटलेला आहे असं सांगत नाराज नसल्याचं म्हटलं होतं. परंतु बीडमध्ये मुंडे समर्थकांच्या राजीनाम्यानंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण पेटलं आहे.
भाजपा जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे, जिल्हा परिषद सदस्य सविता बडे, पंचायत समिती सदस्य प्रकाश खेडकर यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. प्रीतम मुंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश न केल्याने भाजपातील मोठा गट नाराज असल्याचं बोललं जात आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारासाठी प्रीतम मुंडे यांचे नाव चर्चेत होते. परंतु मंत्रिपद न मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली. मुंडे यांना मंत्री नाही केले तर काय झाले. ताई साहेब, आमच्या मनात आताही मंत्री आहेत. पक्ष काय इशारा देतो हे सांगायची गरज नाही राहिली. आता तरी ताईंनी वेगळा निर्णय घ्यावा, असा संदेश सोशल मीडियातून कार्यकर्त्यांनी गुरुवारी पसरविला होता.
४० विधानसभा मतदारसंघांत माजी मंत्री पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे भगिनींचा प्रभाव आहे. पक्षातील वरिष्ठांनी पंकजा मुंडे व प्रीतम मुंडे यांना साथ द्यायला हवी; परंतु साथ न देता त्यांचे पंख छाटण्याचा प्रयत्न चालू आहे. ताईंनी वेगळी भूमिका घ्यावी यासाठी आम्ही आग्रह करणार आहोत, असे भाजपा कार्यकर्ता सचिन गीत्ते यांनी सांगितले. जनतेतून विक्रमी मताने निवडून येणाऱ्या नेत्यास डावलल्यामुळे जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्ते नाराज आहेत. स्व. गोपीनाथ मुंडे यांनी भाजपा तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवली. हाच वसा पुढे चालवत संघर्ष यात्रेच्या माध्यमातून पंकजा व खा. प्रीतम मुंडे यांनी पक्षाला सत्तेवर बसवण्यात मोलाचा वाटा उचलला होता. मात्र, आता काही स्वकीयांच्याच कारस्थानांमुळे मुंडे भगिनींना डावलण्याचा हा प्रकार आहे. यामुळे भाजपाचेच नुकसान होणार आहे, असे अश्विन मोगरकर यांनी सांगितले.
“टीम नरेंद्र, टीम देवेंद्र भाजपाला मान्य नाही”; नाराज असल्याच्या चर्चेवर पंकजा मुंडेंचा जाहीर खुलासा
पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
भारतीय जनता पार्टीत निर्णय घेण्याची एक प्रक्रिया आहे. प्रीतम मुंडे, हिना गावित यांची नावं चर्चेत होती. ती नावं न येता दुसऱ्यांना संधी मिळाली. पक्ष संघटनेच्या दृष्टीकोनातून नेतृत्व निर्णय घेत असतं. प्रत्येक राज्याच्या बाबतीत असं होतं. प्रीतम मुंडे खूप कष्टाळू आहेत, केवळ गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या इतकंच मर्यादित नाही तर त्यांचे कामही चांगले आहे. सर्वाधिक मतांच्या फरकाने त्या निवडून आल्या आहेत. त्यामुळे प्रीतम मुंडे यांचे नाव चर्चेत आले. पक्षाने घेतलेला निर्णय पटलेला आहे. भाजपा मला संपवत आहे असं मला वाटत नाही. मी छोटीशी कार्यकर्ता आहे त्यासाठी पंतप्रधानापासून कामाला लागतील असं वाटत नाही अशा शब्दात पंकजा मुंडेंनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या होत्या. मात्र त्यानंतरही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी कायम आहे.
संघर्ष थांबणार नाही. यापुढेही तो सुरूच राहील - पंकजा मुंडे @Pankajamunde#CabinetExpansion#BJP#NarendraModihttps://t.co/LY5IOX1NDo
— Lokmat (@MiLOKMAT) July 9, 2021