Cabinet reshuffle: मोदींच्या नव्या मंत्रिमंडळाची आज मोठी बैठक; मंत्रीदेखील पदभार स्वीकारणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 08:38 AM2021-07-08T08:38:22+5:302021-07-08T08:40:23+5:30
Narendra Modi Cabinet Reshuffle: केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार बुधवारी होऊन ४३ मंत्र्यांचा राष्ट्रपती भवनामध्ये शपथविधी झाला. त्यामध्ये १५ जणांनी कॅबिनेट तर २८ जणांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते नारायण राणे यांना कॅबिनेट तर कपिल पाटील, डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड यांना राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) जंबो मंत्रिमंडळाचा (Cabinet expansion) काल विस्तार करण्यात आला. केंद्रीय मंत्रिमंडळात 38 नवे चेहरे घेण्यात आले असून आज हे सारे मंत्री पदभार स्वीकारणार आहेत. मोदींच्या अध्यक्षतेखाली या मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक आज होणार असून यामध्ये पदभार स्वीकारण्याबरोबरच मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. (PM Narendra Modi called first cabinet meeting after Reshuffle.)
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार बुधवारी होऊन ४३ मंत्र्यांचा राष्ट्रपती भवनामध्ये शपथविधी झाला. त्यामध्ये १५ जणांनी कॅबिनेट तर २८ जणांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते नारायण राणे यांना कॅबिनेट तर कपिल पाटील, डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड यांना राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे हे चारही जण वेगळ्या पक्षांतून भाजपमध्ये आले आहेत. मोदींचे मंत्रिमंडळ आता ७८ जणांचे झाले असून त्यात ३८ नव्या चेहेऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काउंसिल ऑफ मिनिस्टर्स (मंत्रिपरिषद) आणि मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये मोदी काही महत्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे. आज सायंकाळी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. यानंतर सात वाजता मंत्रिपरिषदेची बैठक बोलावण्यात आली आहे. या परिषदेच्या बैठकीत कॅबिनेट, स्वतंत्र प्रभार आणि राज्यमंत्री सहभागी होणार आहेत.
हरदीप पुरी, भूपेंद्र यादव, अनुराग ठाकूर यांना बढती
हरदीप पुरी, भूपेंद्र यादव, अनुराग ठाकूर आदींना राज्यमंत्रीपदावरून कॅबिनेट मंत्रीपदी बढती देण्यात आली आहे. त्यांनी केलेले काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पसंतीस उतरले होते.
२५ राज्यांना मिळाले प्रतिनिधीत्व
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात २५ राज्यांना प्रतिनिधीत्व मिळाले आहे. ज्या पंधरा कॅबिनेट मंत्र्यांनी शपथ घेतली, त्यांच्यात आठ नवे चेहरे असून सात जणांना बढती मिळाली आहे.
आता भाजप संघटनेतही होणार मोठे बदल; जावडेकरांसह 'या' नेत्यांना मिळू शकते मोठी जबाबदारी
१२ मंत्र्यांचे राजीनामे
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या काही तास आधी केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याचे मंंत्री प्रकाश जावडेकर, आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, माहिती तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद या मंत्र्यांसह १२ केंद्रीय मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामध्ये शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक, संतोषकुमार गंगवार, देबश्री चौधरी, रतनलाल कटारिया, संजय धोत्रे, थावरचंद गेहलोत, डी. व्ही. सदानंद गौडा, प्रतापचंद्र सारंगी, आदींचीही नावे आहेत.