Cabinet Reshuffle: 'नारायण राणेंची उंची त्यापेक्षाही मोठी...'; संजय राऊत यांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 11:39 AM2021-07-08T11:39:52+5:302021-07-08T11:41:42+5:30
Sanjay Raut reaction on Narayan Rane: नारायण राणेंना सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
मुंबई: काल नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. त्यात महाराष्ट्रातून चार खासदारांना मंत्रीपद देण्यात आले. यात भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांना सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. राणेंच्या मंत्रीपदावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'नारायण राणेंना सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खात्याचे मंत्रिपद देण्यात आले. पण, त्या मंत्रीपदापेक्षा त्यांची उंची मोठी आहे. त्यांनी रोजगार आणि उद्योगांना संजीवनी द्यावी. आमच्या त्यांना शुभेच्छा,' असे राऊत म्हणाले.
माध्यमाशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले, बेरोजगारी, महागाई, आरोग्य या सगळ्या संदर्भात महाराष्ट्राच्या मंत्र्यांवर जबाबदारी आली आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला काही मंत्रिपदे आली आहेत. पण, प्रकाश जावडेकरांसारखा अनुभवी आणि ज्येष्ठ असलेला मोहरा पडला. नक्कीच नारायण राणेंना मंत्री सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खाते दिले, पण राणेंची उंची त्यापेक्षा मोठी आहे. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अनेक मंत्रीपदे भूषविली आहे. आता फक्त राणेंपुढे रोजगार वाढवण्याचे मोठे काम आहे, असे राऊत म्हणाले. तसेच, मधल्या काळात लहान उद्योग मरून पडला होता. त्याला संजीवनी देण्याचे आव्हान राणेंसमोर आहे. रोजगार निर्मितीचे काम त्यांच्या पुढे आहे. हा व्यक्तिगत टीका टिप्पणीचा विषय नाही. राणे चांगले काम करतील. ते महाराष्ट्रात उद्योग आणतील असा विश्वासही राऊत यांनी बोलून दाखवला.
भाजपने शिवसेना, राष्ट्रवादीचे आभार मानावे
राऊत पुढे म्हणाले, आमच्याकडून झालेल्या पुरवठ्याबद्दल भाजपने शिवसेना, राष्ट्रवादीचे आभार मानले पाहिजेत. आमच्यामुळे त्यांना मंत्रिमंडळासाठी चेहरे मिळाले. कपिल पाटील हे राष्ट्रवादीचेच प्रोडक्ट आहे. भारती पवारही राष्ट्रवादीच्याच होत्या. राणे तर शिवसेना, काँग्रेस करत भाजपमध्ये गेले. म्हणजे मंत्रिमंडळाचा मूळ चेहरा हा शिवसेना-राष्ट्रवादीचाच आहे, असा चिमटहा त्यांनी काढला.