पोलिसांनी अडवलं तर आमदारांना फोन करा : हेल्मेटसक्ती विरोधी कृती समितीने मोबाईल नंबर केले व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2019 08:42 PM2019-01-01T20:42:33+5:302019-01-01T20:44:53+5:30
पुणे पोलिसांनी हेल्मेट सक्तीची प्रभावी अंमलबजावणी सुरु केल्यापासून पुण्यातील काही संस्था संघटनांनी शहरातील वापराच्या सक्तीला विरोध करण्यास सुरुवात केली आहे.
पुणे : पुणे पोलिसांनी हेल्मेट सक्तीची प्रभावी अंमलबजावणी सुरु केल्यापासून पुण्यातील काही संस्था संघटनांनी शहरातील वापराच्या सक्तीला विरोध करण्यास सुरुवात केली आहे.या हेल्मेटसक्तीच्या विरोधात येत्या गुरुवारी रॅली तर काढण्यात येणार आहेच पण त्याआधी शहरातील लोकप्रतिनिधींना थेट फोन करण्याचे आवाहन कृती समितीने केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पोलिसांनी हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे महिनाभरापूर्वी जाहीर केले होते. त्यानुसार आजपासून पोलिसांनी इ-चलन फाडण्यास सुरुवात केली. या विरोधात हेल्मेटसक्ती विरोधी कृती समितीने घेतलेल्या बैठकीत सविनय कायदेभंग करत मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. पण त्याच वेळी त्यांनी पुण्यातील लोकप्रतिनिधी असलेल्या आठ आमदार व चार खासदार यांचे फोन नंबर व्हायरल केले आहेत. याबाबत स्पष्टीकरण देताना कृती समितीने सांगितले की, हे सर्व आमदार निवडून येण्यापूर्वी हेल्मेटसक्तीला विरोध करत होते. यावेळी मात्र कोणी एक शब्दही उच्चारलेला नाही. त्यामुळे विजय काळे सोडल्यास इतर आमदारांनी लोकप्रतिनिधी म्हणून भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे. मात्र असे घडत नसल्याने त्यांचे मोबाईल नंबर समाजमाध्यमात दिले जात असून पोलिसांनी पकडल्यावर त्यांना फोन अगर एसएमएस करावा असेही सांगण्यात आले. अर्थात यामुळे आमदारांची डोकेदुखी वाढणार असून पुणेकरांच्या प्रश्नांना उत्तरे देता देता नाकी नऊ येतील यात शंका नाही. या बैठकीला माजी महापौर अंकुश काकडे, मोहनसिंग राजपाल, शांतीलाल सुरतवाला,संदीप खर्डेकर,विवेक वेलणकर,मंदार जोशी,धनंजय जाधव आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.