सुप्रिया सुळे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असू शकतात का? शरद पवार म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 06:34 PM2024-09-18T18:34:34+5:302024-09-18T18:39:47+5:30
Sharad Pawar On Chief Minister Face of MVA : महिला मुख्यमंत्री म्हणून सुप्रिया सुळे आणि रश्मी ठाकरे यांची नावे चर्चेत आली. त्याबद्दल राजकीय वर्तुळातून बऱ्याच प्रतिक्रिया उमटल्या. पण, सुप्रिया सुळे मुख्यमंत्री पदाच्या चेहरा असू शकतात का, याबद्दल शरद पवारांना काय वाटते?
Sharad Pawar on CM Face Of Maha Vikas Aghadi : सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्री होऊ शकतात, अशी चर्चा पुन्हा सुरू झाली. काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी बद्दल भाष्य केले. त्यानंतर राजकीय वर्तुळातून बऱ्याच उलट सुलट प्रतिक्रिया उमटल्या. जेव्हा शरद पवारांना याबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी वेगळे उत्तर दिले.
शरद पवारांनी बीबीसी मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली.
अशा चर्चा सुरू आहेत की, सुप्रिया सुळे या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असू शकतात. तुम्हाला त्याबद्दल काय वाटते? असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला होता.
सुप्रिया सुळे आणि मुख्यमंत्रिपद, पवार काय म्हणाले?
शरद पवार म्हणाले, "माझ्या मते. मला जे माहिती आहे, त्यांचा रस संसदेत आहे. खासदार म्हणून काम करण्याची त्यांना आस्था आहे. त्यांची संसदेतील उपस्थिती ९५ टक्क्यांच्या पुढे असते. नुसती उपस्थिती जास्त असते असे नाही. ११ वाजता सभागृहात गेल्यानंतर सभागृह संपेपर्यंत त्यांची उपस्थिती असते."
"अनेक प्रश्नांवरील चर्चेत सहभाग होण्यावर तिचे अधिक लक्ष असते. त्याचं रँकिंग असते. संसद सदस्य म्हणून तिचे रँकिंग जास्त आहे. त्याच्यात तिचे लक्ष आहे. राज्यातील सत्तेची स्थळे आहेत, त्याबद्दल फार आस्था तिला आहे, असे मला वाटत नाही", असे उत्तर शरद पवारांनी दिले.
मुख्यमंत्रिपदाबद्दल महाविकास आघाडीचा निर्णय कधी?
महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबद्दलही बरीच चर्चा झाली. त्याबद्दलही पवारांनी भाष्य केले.
शरद पवार म्हणाले, "आता आम्हाला परिवर्तन पाहिजे. बदल पाहिजे. कोण मुख्यमंत्री, हे आम्ही नंतर ठरवू. पहिल्यांदा बदल करू. काही लोकांना असे वाटते की, आधी ठरवले तर त्याचा परिणाम होतो. मला अजिबात वाटत नाही. आज महाराष्ट्रात प्रश्न बदलाचा, परिवर्तनाचा आहे. कुणी नेतृत्व करायचे, हा प्रश्न निवडणूक झाल्यानंतर एकत्र बसून सोडवता येईल. यावेळी तो विषय आमच्या दृष्टीने महत्त्वाचा नाही", असे उत्तर शरद पवारांनी दिले.