बिगर आदिवासी मते खेचण्यावर उमेदवारांचा भर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2019 05:50 AM2019-04-21T05:50:20+5:302019-04-21T05:50:51+5:30
बंडखोरीमुळे भाजपच्या अडचणींत वाढ; मतांच्या ध्रुवीकरणावर विजयाचे समीकरण
- रमाकांत पाटील
राज्यातील पहिल्या क्रमांकाचा लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि भाजप यांच्यात चुरशीची लढत होत आहे. भाजपच्या विद्यमान खासदार डॉ.हिना गावीत यांनाच पुन्हा उमेदवारी मिळाल्याने आपली जागा कायम राखण्यासाठी त्यांनी पूर्ण प्रतिष्ठा पणाला लावली आहे. दुसरीकडे काँग्रेसने ३५ वर्षात प्रथमच उमेदवार बदलला असून सलग सहा वेळा आमदार असलेले अॅड. के. सी. पाडवी यांना उमेदवारी देवून पुन्हा आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
नंदुरबार लोकसभा मतदारसंघात एकुण ११ उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत भाजप आणि काँग्रेस यांच्यातच होणार असल्याचे स्पष्ट आहे. मतदारसंघात एकुण सहा विधानसभा मतदारसंघ असून त्यात चार ठिकाणी काँग्रेसचे आमदार आहेत. त्यापैकी एका ठिकाणी स्वत: काँग्रेसचे उमेदवार के. सी. पाडवी हे प्रतिनिधीत्व करीत आहेत. भाजपचे केवळ दोन आमदार आहेत. त्यापैकी एका ठिकाणी डॉ. हिना गावीत यांचे वडील आमदार डॉ. विजयकुमार गावीत हे प्रतिनिधीत्व करीत आहे. यावेळी प्रथमच दोन्ही पक्षातील उमेदवार उच्चशिक्षीत असल्याने लढतीकडे सर्वांचे लक्ष आहे. मतदारसंघात ६५ टक्के आदिवासी मतदार असून ३५ टक्के बिगर आदिवासी मतदार आहेत. दोन्ही उमेदवारांनी बिगर आदिवासी मतदारांची मते मिळविण्यासाठी लक्ष केंद्रीत केले आहे.
याशिवाय भाजपचे बंडखोर डॉ. सुहास नटावदकर यांची उमेदवारी भाजपच्या अडचणीत वाढ करणारी ठरु शकते. तसेच बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी, भारतीय ट्रायबल पार्टी, बहुजन मुक्ती पार्टी यांच्यासह चार अपक्ष उमेदवार आहेत. निवडणुकीच्या प्रमुख स्पर्धेत हे उमेदवार नसले तरी त्यांना मिळणाºया मतांवर बरेच काही अवलंबून राहणार आहे. त्यामुळे मतांची विभागणी आणि जातीय ध्रुवीकरण यावरच जय-पराजयाचे समीकरण अवलंबून आहे.
गेल्या पाच वर्षांत आपण या मतदारसंघाच्या विकासासाठी अनेक कामे केली. ४० वर्षांत जे झाले नाही, ते पाच वर्षांत करून दाखविले. विकासाच्या मोठ्या प्रकल्पांबरोबरच वैयक्तिक लाभाच्या योजना गाव-पाड्यापर्यंत पोहोचविल्या आहेत. त्यामुळे मतदार संघातील मतदार निश्चित आपल्याला साथ देतील याची खात्री आहे.
- डॉ.हिना गावीत, भाजप
आपण सलग सहा वेळा आमदार म्हणून निवडून आलो आहोत. या काळात सातपुड्याच्या विकासासाठी काम केले आहे. गेल्या पाच वर्षांत केंद्र आणि राज्यातीलही भाजपच्या सरकारला जनता कंटाळली असून, हे सरकार लोकहिताचे नाही, असे जनतेला वाटू लागले आहे. काँग्रेसचे नेते आपल्या पाठीशी असल्याने विजयाची खात्री आहे.
- अॅड.के.सी.पाडवी, काँग्रेस
कळीचे मुद्दे
नंदुरबारमध्ये आदिवासींचे प्रमाण सर्वाधिक असून त्यांचे स्थलांतर व आरोग्याचे प्रश्न अजून सुटलेले नाहीत.
बिगर आदिवासी भागातील तापीवरील बॅरेज प्रकल्प तयार झाले असले तरी उपसा योजना रखडल्याने प्रकल्पातील पाणी शेतापर्यंत पोहचले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी.