काँग्रेस आणि भाजपातर्फे उमेदवारांची चाचपणी वेगात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 06:07 AM2019-03-05T06:07:47+5:302019-03-05T06:08:04+5:30

या आठवड्यात लोकसभा निवडणुकांची घोषणा होईल, असे दिसत आहे. मध्य प्रदेशात यंदाची लढाई मुख्यत: काँग्रेस व भाजपामध्येच आहे.

Candidates speeding up by Congress and BJP | काँग्रेस आणि भाजपातर्फे उमेदवारांची चाचपणी वेगात

काँग्रेस आणि भाजपातर्फे उमेदवारांची चाचपणी वेगात

- प्रसाद कुलकर्णी
या आठवड्यात लोकसभा निवडणुकांची घोषणा होईल, असे दिसत आहे. मध्य प्रदेशात यंदाची लढाई मुख्यत: काँग्रेस व भाजपामध्येच आहे. मोदी लाटेचा प्रभाव लुप्त झाल्याचे विधानसभा निवडणुकांनी दाखवून दिले आहे. तरीही २६ फेब्रुवारीच्या एअर स्ट्राइकचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न देशभर भाजपा करणार असून, हीच काँग्रेससमोर डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत.
पाकिस्तानविरुद्ध अशी लष्करी कारवाई करण्याचे धारिष्ट्य इंदिरा गांधी यांच्यानंतर नरेंद्र मोदींनी दाखविले. त्यामुळे त्या प्रचारावरून जनतेचे मन वळविण्याचे मोठे आव्हान काँग्रेसपुढे आहे. त्यामुळे स्थानिक प्रश्नांपेक्षा हाच मुद्दा कळीचा ठरतो की काय, असे वाटत आहे. पण मतदानाला वेळ असल्याने मधल्या काळात बऱ्याच घडामोडी घडू शकतात.
विधानसभा निवडणुकीतील विजय ही काँग्रेसची जमेची बाजू आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने विन २९ हे मिशन ठरविले आहे. म्हणजे सर्व जागा जिंकण्याची काँग्रेसची महत्त्वाकांक्षी इच्छा व योजना आहे. अधिकाधिक जागा जिंकण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले तर त्याच्या जवळ तरी जाता येते. अर्थात त्यासाठी प्रयत्नांची शिकस्त अन् जनतेचा कौल हवा. त्यामुळे काँग्रेस विचारपूर्वक नियोजनबद्ध पाऊले टाकत आहे.
भिंड, ग्वाल्हेर व सीधीमध्ये मुख्यमंत्री कमलनाथ यांनी बैठका घेतल्या. सध्या ते ठिकठिकाणी पदाधिकाऱ्यांची मते ऐकून घेत आहेत. त्यानंतरच ते या तीन मतदारसंघांचे उमेदवार ठरवतील. ग्वाल्हेर, चंबळ, अंचल या पट्यातील विभानसभेच्या ३४ पैकी २६ काँग्रेसने जागा जिंकल्या आहेत. जनमताचा हाच कौल लोकसभेत कायम ठेवण्याचा काँग्रेसचा इरादा आहे. ज्योतिरादित्य शिंदे हे काँग्रेसचे एक हुकमी एक्का मानले जाणारे उमेदवार. ते स्वत: गुना मतदारसंघासाठी इच्छुक असले तरी काँग्रेस त्यांना ग्वाल्हेरमधून उभे करू इच्छिते. गुना- शिवपुरी मतदारसंघासाठी प्रियदर्शनी राजे यांचे पारडे जड वाटते. त्यांचा जनसंपर्क पाहता पक्षश्रेष्ठी त्यांनाच अनुकूल आहेत. भिंड, सीधी व खजुराहोबाबत कमलनाथ १ मार्च रोजी उमेदवार निश्चितीबाबत अंदाज घेतील. सीधीतून कमलेश्वर पटेल, भिंडमधून महेंद्र जाटव तर खजुराहोमधून भाजपातून आलेले रामकृष्ण कुसमरिया हे काँग्रेसचे उमेदवार असू शकतील. जेथे काँग्रेसचे प्राबल्य आहे, तिथे नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासाठी चाचपणी सुरू आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी पुढील आठवड्यात राज्यात १0 ते १२ सभा घेण्याची शक्यता आहे. त्याची जोरदार तयारी सुरू आहे. भाजपाही तयारीत मागे नाही. पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या सूचनांनंतर वरिष्ठ नेत्यांनी विद्यमान खासदारांचा लेखाजोखा तयार केला. त्यात २७ पैकी १४ खासदार नापास झाल्याने त्यांचा पत्ता ‘कट’ होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या कामांचे डांगोरे पिटत राहण्याच्या सूचना पाळण्यात हे खासदार अपयशी ठरले आणि निष्क्रियही होते, अशी तक्रार आहे.
भिंडचे भागीरथप्रसाद, सागरचे लक्ष्मीनारायण यादव, मंदसौरचे सुधीर गुप्ता, भोपाळचे अलोक संजर, राजगढचे रोडमल नागर, होशिंगाबादचे उदयप्रताप सिंग, रिवा येथील जनार्दन मिश्रा, सीधी येथील रीती पाठक, उज्जैनचे चिंतामणी मालवीय, धारच्या सावित्री ठाकूर, मुरैनाचे अनुप मिश्रा खरगोनचे सुभाष पटेल यांच्यावर टांगती तलवार आहे. त्यामुळे नवे इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. भाजपाकडे हे हौशे, गवशे, नवशे आपले तुणतुणे वाजवत आहेत.
अर्थात भाजपची ‘थिंक टँक’ समजले जाणारे राष्ट्रीय उपाध्यक्ष व प्रदेश प्रभारी डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्यासारख्या शांत नेत्याकडे उमेदवार निवडीची सूत्रे आहेत. ते अशा मंडळींना जवळ करण्याची शक्यता कमीच. तरीही भाजपाला बंडाळीला तोंड द्यावे लागेल आणि मतविभागणीचा फायदा आपल्याला होईल, असे काँग्रेसला वाटत आहे. भाजपला उमेदवार निवडीबाबत रा.स्व. संघही ठिकठिकाणी भाजप कार्यकर्त्यांची मने जाणून घेऊन मदत करीत आहे.
>‘ताई’ विरुद्ध ‘भाई’
भाजपामध्ये सर्वाधिक चुरस इंदोरसाठी आहे. ताई म्हणून ओळखल्या जाणाºया सुमित्रा महाजन या ९ वेळा इथून विजयी झाल्या असल्या तरी आता त्यांना कडवे आव्हान भाई म्हणून ओळखले जाणारे कैलास विजयवर्गीय यांनी दिले आहे. गेल्या वेळी ताई म्हणाल्या होत्या की, इंदोर लोकसभेची चावी माझ्या हाती आहे. योग्य वेळी मी योग्य व्यक्तीकडे ती सुपूर्द करीन. पाऊणशे वय असलेल्या ताई अजूनही चावी सोडायला तयार नाहीत. कैलास विजयवर्गीय दांडगा जनसंपर्क असलेले प्रबळ उमेदवार आहेत. त्यांना दुखवणे पक्षश्रेष्ठींना परवडणारे नाही. पर्यायाने तिकिटासाठी ओढाताण झाल्यास त्याचा फायदा काँग्रेसला होऊ शकतो. त्यामुळे इंदोरचा उमेदवार ठरविणे, ही भाजपासाठी डोकेदुखी आहे.

Web Title: Candidates speeding up by Congress and BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.