कर्तृत्ववान मराठा स्त्री व्हावी राज्याची मुख्यमंत्री; शरद पवारांसमोर आशिष शेलारांची फटकेबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2020 06:44 AM2020-11-21T06:44:01+5:302020-11-21T06:44:53+5:30
Ashish Shelar News: मुंबई भाजपमधील मोठे नेते मानले जाणारे आशिष शेलार सध्या बाजूला पडल्याचे चित्र आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या संदर्भात दोनच दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते पदी कार्यकारिणीची बैठक झाली. यात पालिका निवडणुकीची जबाबदारी अतुल भातखळकर यांच्याकडे सोपविण्यात आली. या महत्त्वाच्या बैठकीला शेलार अनुपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुुंबई : महाराष्ट्राची मुख्यमंत्री कर्तृत्ववान मराठा स्त्री व्हावी अशी अपेक्षा बाळगणारा मोठा वर्ग समाजात आहे. याला माझ्यासारख्या माणसाचेसुद्धा शंभर टक्के समर्थन असू शकते, असे वक्तव्य करीत भाजप नेते आशिष शेलार यांनी शुक्रवारी खळबळ उडवून दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीतच शेलार यांच्या या शाब्दिक फटकेबाजीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
पत्रकार विजय चोरमारे लिखित ‘कर्तृत्ववान मराठा स्त्रिया’ या पुस्तकाचे शुक्रवारी मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्रात शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या वेळी शेलार आणि पत्रकार ज्ञानेश महाराव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पुस्तक प्रकाशनानंतर महाराव यांनी आशिष शेलार यांचा उल्लेख ‘महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री’ असा केला. यानंतर पुस्तकावरील आपल्या भाषणात शेलार यांनी महारावांच्या या वक्तव्याला उत्तर देताना ‘कर्तृत्ववान मराठी स्त्री राज्याच्या मुख्यमंत्रिपदी आल्यास आपले शंभर टक्के समर्थन असेल,’ असे विधान केले. पवारांच्या उपस्थितीतील या विधानानंतर शेलार यांचा रोख सुप्रिया सुळे यांच्याकडे असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे एकाचवेळी महाविकास आघाडीसह भाजपलाही त्यांनी
एक प्रकारे इशारा दिल्याचे मानलेजात आहे.
शरद पवार हे मोठ्या मनाचे मोठे नेते आहेत. मोठ्या पदावर तर बरेच लोक बसतात, पण मोठ्या मनाने मोठ्या पदावर बसणाऱ्या व्यक्ती या महाराष्ट्रात खूप कमी आहेत. मला कुणाशी तुलना करायची नाही, असेही शेलार या वेळी म्हणाले. या विधानाचा रोख कुणाकडे, अशी चर्चाही आता सुरू झाली आहे.
कार्यकारिणीच्याबैठकीत अनुपस्थित
मुंबई भाजपमधील मोठे नेते मानले जाणारे आशिष शेलार सध्या बाजूला पडल्याचे चित्र आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या संदर्भात दोनच दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते पदी कार्यकारिणीची बैठक झाली. यात पालिका निवडणुकीची जबाबदारी अतुल भातखळकर यांच्याकडे सोपविण्यात आली. या महत्त्वाच्या बैठकीला शेलार अनुपस्थित होते. पक्षाने हैदराबादचे सहप्रभारी पद दिल्याने तेथील बैठकीसाठी ते हैदराबाद येथे असल्याचे सांगण्यात आले. एकीकडे भाजप नेते, कार्यकर्ते वीज बिलाच्या प्रश्नावर आंदोलन करीत असताना शेलार यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीतील पुस्तक प्रकाशन सोहळ्यात टोलेबाजी केली. त्यांचे विधान भाजपच्या प्रदेश नेतृत्वाला इशारा तर नाही ना? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.