“शिवसेनेत जातीपातीचं राजकारण”; शिवसैनिकाने लिहिलं थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र
By प्रविण मरगळे | Published: September 29, 2020 05:18 PM2020-09-29T17:18:50+5:302020-09-29T17:20:35+5:30
अहमदनगर शिवसेनेमध्ये चाललेली धुसपूस थांबवावी अन्यथा या पुढील काळात शिवसेनेला मोठी किंमत मोजावी लागणार आहे असंही चंद्रकांत शेळके यांनी पत्राच्या शेवटी म्हटलं आहे.
अहमदनगर – शहरातील शिवसेनेची अंतर्गत धुसपूस चव्हाट्यावर आली आहे. याठिकाणी शिवसेना विभाग प्रमुख चंद्रकांत सुर्यभान शेळके यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे याबाबत तक्रार केली आहे. शिवसेनेत जातीपातीचं राजकारण होत असल्याचा आरोप या पत्राच्या माध्यमातून करण्यात आला आहे. मंत्री शंकरराव गडाख आणि शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनाही या पत्राची प्रत पाठवण्यात आली आहे.
या पत्रात चंद्रकांत शेळके म्हणतात की, अहमदनगरमध्ये गुरुवारी स्वीकृत नगरसेवक भरणार आहेत, आजपर्यंत अनिल भैय्या राठोड यांनी कधीही जातीचे राजकारण शिवसेनेत केले नाही, त्यामुळे अहमदनगर येथील शिवसेना संघटना बळकट राहिली, परंतु काही दिवसांपासून याठिकाणी जातीचे राजकारण सुरु आहे. या राजकारणातून अनिल राठोड यांना पराभूत केले होते, आजही स्वीकृत नगरसेवकाच्या वेळी जातीचे राजकारण करुन दोन्ही उमेदवार एकाच जातीचे दिले आहेत असं त्यांनी सांगितले आहे.
तसेच आपण यात लक्ष घालावं नाहीतर अहमदनगरची शिवसेना एकतर भाऊ कोरेगावकर आणि काही जातीवादी फुटीर शिवसैनिकांनी आपल्या पक्षाला गळती लावायचं काम करुन राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने लक्ष घालावे, व अहमदनगर शिवसेनेमध्ये चाललेली धुसपूस थांबवावी अन्यथा या पुढील काळात शिवसेनेला मोठी किंमत मोजावी लागणार आहे असंही चंद्रकांत शेळके यांनी पत्राच्या शेवटी म्हटलं आहे.
स्वीकृत नगरसेवकावरुन भाजपातही जुगलबंदी
स्वीकृतसाठी आता भाजपामध्येच अंतर्गत जुगलबंदी रंगली आहे. किशोर डागवाले हेच खरे घोडेबाजाराचे जनक आहेत, असा टोला भाजपच्या एका पदाधिका-याने लगावला आहे. ‘स्वीकृतसाठी मी इच्छुक नाही’ असे सांगत भाजपाचेच ज्येष्ठ नेते, माजी नगरसेवक किशोर डागवाले यांनी मात्र भाजपच्या घोडेबाजारात आपल्याला रस नाही, असे वक्तव्य केले होते. त्यावर शहर भाजपाच्या एका पदाधिका-याने डागवाले यांचा समाचार घेतला आहे.
डागवाले यांनीच शिवसेना फोडली. त्यांच्यामुळेच महापालिकेत काँग्रेसची सत्ता आली होती. एका पक्षात रहायचे आणि महापौरपदाच्या दुस-या पक्षातील उमेदवाराला मतदान करण्यासारखे अनेक कामे त्यांच्या नावावर आहेत. घोडेबाजाराचे जनक, संस्थापक अशा उपाध्या डागवाले यांनाच देता येतील, अशी टीकाही पदाधिका-याने केली. त्यामुळे आता भाजपामध्येच जुगलबंदी रंगली आहे.
दुसरीकडे आमदार संग्राम जगताप यांनीही भाजपाचे आणखी काही जण भाजपामध्ये येणार असे म्हटलं होते. त्या अनुषंगाने डागवाले यांचा भाजपामध्ये प्रवेश होणार का? आणि मनोज कोतकर यांच्याप्रमाणे त्यांनाही पद मिळणार का? याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्यानेच राष्ट्रवादीमध्ये जाण्यासाठी सहकार्य केले आहे. या भाजपा नेत्यामुळेच राष्ट्रवादीच्या कोट्यातून स्वीकृत होण्याचा डागवाले यांचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती आहे.