सेलिब्रिटींवर उमेदवारांनी मारली फुली, स्टार नव्हे तर काम पाहून देणार मते

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 01:19 AM2019-04-14T01:19:33+5:302019-04-14T01:20:05+5:30

सलमान खानपासून भाऊ कदमपर्यंत आणि कॅतरिना कैफपासून सई ताम्हणकर यांच्यापर्यंत अनेक सेलिब्रिटी मुंबई, ठाण्यातील उमेदवारांच्या प्रचारात २०१४ मध्ये दिसले होते.

On the celebrity, the candidates killed, not star, but look at the work | सेलिब्रिटींवर उमेदवारांनी मारली फुली, स्टार नव्हे तर काम पाहून देणार मते

सेलिब्रिटींवर उमेदवारांनी मारली फुली, स्टार नव्हे तर काम पाहून देणार मते

Next

- प्रज्ञा म्हात्रे 

ठाणे : सलमान खानपासून भाऊ कदमपर्यंत आणि कॅतरिना कैफपासून सई ताम्हणकर यांच्यापर्यंत अनेक सेलिब्रिटी मुंबई, ठाण्यातील उमेदवारांच्या प्रचारात २०१४ मध्ये दिसले होते. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत ठाण्यात उमेदवारांनीच सेलिब्रिटींच्या नावावर फुली मारली आहे. काही उमेदवारांनी केलेल्या सर्वेक्षणावरून मतदार सेलिब्रिटी पाहून नव्हे, तर उमेदवारांची कामे पाहून मते देत असल्याचे निदर्शनास आल्याने उमेदवारांनी हा निर्णय घेतला आहे.
ठाण्यातील उमेदवारांचा प्रचार रंगात आला आहे. मतदारांना प्रत्यक्ष भेटण्यावर उमेदवारांचा जास्त जोर आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी मुंबई, ठाण्यात सेलिब्रिटींना प्रचारात सामील करून घेण्याचा ट्रेण्ड २०१४ च्या निवडणुकीत होता. २०१९ लोकसभा निवडणुकीत तो पूर्णपणे बदलला आहे. सेलिब्रिटींना सामील करून मतपरिवर्तन होत नाही, असे उमेदवारांचे मत असल्याने त्यांनी सेलिब्रिटींकडे धाव घेतलेली नाही. गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामांचा आणि भविष्यात करण्यात येणाऱ्या कामांचा पाढा ते मतदारांसमोर वाचत आहेत.
जास्तीतजास्त मतदारांना आकर्षित करण्यासाठी सेलिब्रिटींना प्रचारात सामील करून घेण्याचा असलेला ट्रेण्ड आता ठाण्यात मोडीत निघालेला पाहायला मिळत आहे. सकाळी ७ ते ९ रेल्वेस्टेशनवर प्रचार, सकाळी ९ ते १२ रथावरून प्रचार, दुपारी डोअर-टू-डोअर मतदारांच्या गाठीभेटी, सायंकाळी ५ ते १० पुन्हा रथावर प्रचार असा ठाण्यातील उमेदवारांचा प्रचाराचा कार्यक्रम आहे. आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी त्यांचे कार्यकर्ते, समर्थक उतरले आहेत. या निवडणुकीत उमेदवारांनी सेलिब्रिटींना सामील करून घेतले नसल्याचे उमेदवारांच्या प्रचारव्यवस्थेचे व्यवस्थापक संदीप वेंगुर्लेकर यांनी सांगितले. सेलिब्रिटींमुळे मतांमध्ये जास्त फरक पडणार नाही. त्यांच्याकडे पाहून आपल्याला मते मिळणार नाहीत. उमेदवारांनी मुद्द्यांवर बोलावे, असे बहुतांश मतदारांचे म्हणणे असल्याने लोकसभा २०१९ च्या निवडणुकीत सेलिब्रिटींच्या तारखा मिळवण्याकरिता उमेदवार धडपडत नसल्याचे वेंगुर्लेकर म्हणाले. प्रचाराआधी उमेदवारांच्या प्रचाराचे नियोजन करणाऱ्यांनी सर्वेक्षण केल्यावर त्यांच्या लक्षात आले की, मतदारांना उमेदवारांनी काय काम केले आणि भविष्यात काय काम करणार आहेत, हेच महत्त्वाचे वाटत आहे. यावर आधारित प्रचार करण्याचा निर्णय उमेदवारांनी घेतला असल्याने सेलिब्रिटींच्या नाकदुºया काढण्याऐवजी जास्तीतजास्त मतदारांना भेटण्याकडे लक्ष देत आहेत. यापूर्वीच्या निवडणुकीतील उमेदवारांचे व्हिडिओ बनवले जात आहेत. यापूर्वी निवडणुकीत सेलिब्रिटी उमेदवारांचा प्रचार करत व त्याचे व्हिडीओ दाखवून मतदारांना मतांकरिता आवाहन केले जात होते. परंतु, या निवडणुकीत स्वत: उमेदवार बोलत आहेत आणि त्यानेच फरक पडेल, असा विश्वास उमेदवारांना आहे. त्यांचे समर्थक हेच सांगत आहेत.
सेलिब्रिटींमुळे गर्दी होऊ शकते, परंतु त्या गर्दीचे मतांमध्ये रूपांतर होत नाही, म्हणून ठाण्यातील उमेदवारांनी सेलिब्रिटींवर फुली मारली, असा अनुभव वेंगुर्लेकर यांनी सांगितला. ज्या उमेदवारांना स्वत:चा चेहरा नाही, तेच सेलिब्रिटींना सामील करून घेतात, असेही ते म्हणाले.
>सेलिब्रिटींची प्रचारफेरी १२ लाखांची
२०१४ मध्ये झालेल्या प्रचारात काही मराठी कलाकारांनी प्रचारासाठी दोन ते अडीच लाख रुपये मानधन घेतले. याखेरीज, काही हिंदी चित्रपटातील कलाकारांनी पाच लाखांचे मानधन घेतले. हे कलाकार केवळ तासभर उमेदवाराच्या प्रचारफेरीत सामील होतात. यावेळी त्यांच्या सुरक्षेकरिता उमेदवाराला बाउन्सर्स तैनात करावे लागतात.
याखेरीज, सेलिब्रिटींना त्यांच्या निवासस्थानापासून नेण्याआणण्याकरिता बीएमडब्ल्यू, मर्सिडीज किंवा आॅडी अशा महागड्या मोटारींची व्यवस्था करावी लागते, असे प्रचारव्यवस्थेच्या व्यवस्थापकांनी ‘लोकमत’ला सांगितले. त्यामुळे एका स्टारला घेऊन प्रचारफेरी करण्याचा तासभराचा खर्च हा १० ते १२ लाखांच्या घरात जातो.

Web Title: On the celebrity, the candidates killed, not star, but look at the work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.