पनवेल ठरतेय मावळच्या निवडणुकीचा केंद्रबिंदू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 12:41 AM2019-04-24T00:41:49+5:302019-04-24T00:43:36+5:30
घाटाखालील मतेच ठरणार निर्णायक; दिग्गज नेत्यांची उपस्थिती
नवी मुंबई : राज्यातील लक्षवेधी लढतीमध्ये मावळचा समावेश आहे. सर्वाधिक मतदार असल्यामुळे पनवेल या निवडणुकीचा केंद्रबिंदू ठरला आहे. निवडणुकीमध्ये घाटाखालील तीन मतदारसंघातील मते निर्णायक ठरणार असल्यामुळे या परिसरामध्ये सभांचा विक्रम होऊ लागला असून, आघाडीसह युतीच्या दिग्गज नेत्यांनी हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे.
पनवेलमध्ये मंगळवारी शिवसेना उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी हजेरी लावली. राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांनी हजेरी लावली. मुख्यमंत्र्यांनी काँगे्रस व राष्ट्रवादीच्या आघाडीला खिचडीची उपाधी देऊन बारामतीचे पार्सल परत पाठवून देण्याचे आवाहन केले. आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर सडकून टीका केली. आरोप-प्रत्यारोपांमुळे पनवेलचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मावळ मतदारसंघामध्ये २२ लाख २७ हजार मतदार आहेत. यामधील घाटावरील चिंचवड, पिंपरी व मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये ११ लाख ५० हजार ७०५ व घाटाखालील पनवेल, उरण व कर्जत मतदारसंघामध्ये १० लाख ७७ हजार २८ मतदार आहेत. दोन्ही प्रमुख उमेदवार घाटावरील असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांची संघटनात्मक बांधणीही मजबूत आहे; परंतु घाटाखालील मतदारसंघामध्ये शिवसेनेला भाजपवर व राष्ट्रवादीला शेतकरी कामगार पक्षावर अवलंबून राहावे लागत आहे. मित्र पक्षाच्या ताकदीच्या आधाराने निवडणूक लढविली जात असल्याने दोन्हीकडून या परिसरावर जास्त लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
घाटाखालील तीनही मतदारसंघांमध्ये पनवेल हा केंद्रबिंदू झाला आहे. सर्वाधिक ५ लाख १४ हजार मतदान या ठिकाणी आहे. याठिकाणी शरद पवार यांनी दोन सभा घेतल्या आहेत. अजित पवार यांनी सर्वाधिक लक्ष या परिसरावर दिले आहे. स्वत: विविध ठिकाणी सभा घेतल्या आहेत. युतीच्या प्रचारासाठी स्वत: मुख्यमंत्री उपस्थित राहिल्याने चुरस वाढली आहे. पनवेलसह घाटाखालील तीनही मतदारसंघांमधून ज्यांना लीड मिळणार त्यांचा विजयाचा मार्ग सोपा असल्यामुळेच सर्वांनी येथे लक्ष केंद्रित केले आहे. आता येथील नागरिक नक्की कोणाच्या पारड्यात मते टाकणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
राष्ट्रवादीसाठी आतापर्यंतची उपस्थिती
शरद पवार, अजित पवार, गणेश नाईक, सुनेत्रा पवार, धनंजय मुंडे, आमदार जयंत पाटील, शशिकांत शिंदे, बाळाराम पाटील, अमरसिंह पंडित, जयंत पाटील, माजी आमदार विवेक पाटील, नवाब मलिक, चित्रा वाघ, नीलेश लंके, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, माणिकराव जगताप यांच्यासह अनेक नेत्यांनी हजेरी लावली आहे.
युतीसाठीची उपस्थिती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, माजी खासदार रामशेठ ठाकूर,सिडको अध्यक्ष प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार मनोहर भोईर, रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हण यांनीही हजेरी लावली होती.