"केंद्र सरकार म्हणजे शेतकऱ्यांचे उभे पीक उध्वस्त करणाऱ्या रानडुकरासारखे!"
By Ravalnath.patil | Published: November 30, 2020 07:41 PM2020-11-30T19:41:13+5:302020-11-30T19:41:52+5:30
anil parab: आपण रानडुकराची भूमिका बजावणाऱ्या सरकारचा भाग आहात तेव्हा आधी आपले पाहा, असा टोला लगावत अनिल परब यांनी नितीन गडकरी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : राज्यातील आघाडी सरकारला बैलाची उपमा देवून स्वतःची कातडी वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपल्याच केंद्रातील सरकारच्या कारभाराबाबत कदाचित अनभिद्न्य आहेत, अशी टीका शिवसेना प्रवक्ते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली.
केंद्रातले सरकार हे शेतकऱ्यांना अतिरेक्यांची उपमा देत आहेत. शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाला नेस्तनाबूत करणाऱ्या रानडुकरासारखे हे केंद्र सरकार काम करत आहे आणि गडकरी हे त्यांच्यासोबत आहेत. बैल किमान शेतकऱ्यांचा मित्र तरी असतो, आघाडी सरकार बैलासारखे असले तरी शेतकऱ्यांचे मित्र आहेत. मात्र आपण रानडुकराची भूमिका बजावणाऱ्या सरकारचा भाग आहात तेव्हा आधी आपले पाहा, असा टोला लगावत अनिल परब यांनी नितीन गडकरी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, राज्य सरकार म्हणजे खट्या (बिनकामाचा) बैल आहे. तुतारी टोचल्याशिवाय चालत नाही. थोडीशी तुतारी काढली की ते थांबते. अशा सरकारला तुतारी टोचण्यासाठी चांगले लोकप्रतिनिधी विधान परिषदेत पाठवा, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी भाजपाच्या पदवीधर निवडणूक मेळाव्यात बोलताना केले होते.