शेतकरी आंदोलनाची दखल ६० दिवस होऊनही केंद्र सरकारने घेतलेली नाही - आदित्य ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 05:43 PM2021-01-25T17:43:35+5:302021-01-25T17:44:19+5:30
Aditya Thackeray : कल्याण-डोंबिवली येथील पत्री पुलाच्या उद्धाटनानंतर आदित्य ठाकरे बोलत होते.
कल्याण : गेल्या दोन महिन्यांपासून कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या वेशीवर थंडी वाऱ्यात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी किसान सभेकडून नाशिक ते मुंबई असा मोर्चा काढण्यात आला. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेचा या किसान सभेच्या मोर्चाला पूर्ण पाठिंबा आहे, असे सांगत शेतकरी आंदोलनाची केंद्र सरकारने किती दखल घेतली, अशी विचारणा केली आहे.
कल्याण-डोंबिवली येथील पत्री पुलाच्या उद्धाटनानंतर आदित्य ठाकरे बोलत होते. "किसान मोर्चाच्या इथे कोणी फिरकलं नाही. यापेक्षा केंद्राने याची किती दखल घेतली आहे. याकडे आपल्याला लक्ष केंद्रीत करायला हवे. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नेतृत्व करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबद्दल बोलले आहेत," असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
याचबरोबर, या शेतकऱ्यांच्या मोर्चेला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे. मात्र 60 दिवस झाले तरी केंद्राने याची दखल घेतलेली नाही, हा प्रश्न आपण विचारायला हवा, असे आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच, जेव्हा मोर्चे येतात, तेव्हा मास्क घालणे गरजेचे आहे. कारण, अजून कोरोना संपलेला नाही, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
दरम्यान, कल्याण आणि डोंबिवली शहरांना जोडणाऱ्या पत्री पुलाचे आज लोकार्पण करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून यासाठी हिरवा कंदील दाखवला. यामुळे आता हा पूल वाहतुकीसाठी खुला झाला आहे.
कंगनाला भेटायला वेळ असतो; पण शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही - शरद पवार
मुंबईत आझाद मैदानात आयोजित किसान मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संबोधित केले. यावेळी राज्याला इतिहासात पहिल्यांदाच असे राज्यपाल लाभले आहेत. हजारो शेतकरी कृषी कायद्यांच्या विरोधात मोर्चा काढून मुंबईत दाखल झाले. या शेतकऱ्यांना राज्यपालांना भेटून आपल्या मागण्यांचे निवेदन द्यायचे आहे. पण आमचे राज्यपाल गोव्याला गेले आहे. राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ आहे. पण माझ्या शेतकऱ्याला भेटायला वेळ नाही, असा टोला शरद पवारांनी राज्यपालांना लगावला.