गुजरातेत २०१४ च्या पुनरावृत्तीचे भाजपापुढे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 06:04 AM2019-01-25T06:04:51+5:302019-01-25T06:05:20+5:30

आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे होमग्राउण्ड गुजरातकडे देशाचे लक्ष असणार आहे.

Challenge BJP in the repeating of 2014 in Gujarat | गुजरातेत २०१४ च्या पुनरावृत्तीचे भाजपापुढे आव्हान

गुजरातेत २०१४ च्या पुनरावृत्तीचे भाजपापुढे आव्हान

Next

- धनंजय वाखारे
आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे होमग्राउण्ड गुजरातकडे देशाचे लक्ष असणार आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत सर्व २६ जागा भाजपाच्या पारड्यात टाकत गुजरातच्या मतदारांनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदासाठी पाठबळ दिले होते. मात्र, डिसेंबर २०१७ मध्ये झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपाला दिलेली टक्कर पाहता २०१९ची लोकसभा निवडणूक भाजपासाठी आव्हान असेल, हे स्पष्ट झाले आहे.
२०१४च्या यशानंतर दोन वर्षातच भाजपाने आनंदीबेन पटेल यांना हटवून विजय रूपानी यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची धुरा सोपविली आणि रूपानी यांच्या नेतृत्वाखालीच २०१७ ची विधानसभा निवडणूूकही लढविली. २०१९च्या लोकसभेची रंगीत तालीम म्हणून या निवडणुकीकडे पाहिले गेले. भाजपाविरुद्ध अन्य सर्व असा सामना झाला. विधानसभेच्या १८२ जागांपैकी भाजपाला ९९, तर काँग्रेसला ७७ जागा मिळाल्या. २०१२च्या तुलनेत भाजपाच्या १६ जागा कमी झाल्या तर कॉँग्रेसच्या १६ जागा वाढल्या. या निवडणुकीत भाजपाचा शहरी भागात दबदबा कायम असल्याचे दिसून आले, तर कॉँग्रेसने ग्रामीण भागात मारलेली मुसंडी भाजपासाठी चिंतेची बाब ठरली.
राज्यात भाजपाने सहाव्यांदा सत्ता संपादन केली असली तरी त्यासाठी विरोधकांनी उभ्या केलेल्या आव्हानांमुळे भाजपाची मोठी दमछाक झाली. भाजपाचा शहरी भागात वरचष्मा राहिला तर काँग्रेसने ग्रामीण भागात आपले हात-पाय पसरले.
पाटीदार, दलित आणि ओबीसी आंदोलनांचा काही प्रमाणात परिणाम दिसून आला; परंतु, त्यामुळे भाजपा उमेदवारांच्या विजयाचा वारू मात्र विरोधकांना अनेक भागात रोखता आलेला नव्हता. हार्दिक पटेल यांच्या आंदोलनाचे केंद्र असलेल्या अहमदाबादमध्ये भाजपाने १६ पैकी तब्बल १२ जागा खिशात घातल्या, तर कॉँग्रेसला अवघ्या ४ जागा मिळविता आल्या. जीएसटीचाही मुद्दा विरोधकांनी लावून धरला होता. परंतु, जीएसटीचा प्रभाव असलेल्या क्षेत्रातील २८ पैकी २६ जागांवर भाजपाने विजयश्री मिळविली होती. त्यातही सुरतमधील १६ पैकी १५ जागांवर भाजपाचेच वर्चस्व राहिले. हे गणित पाहता मोदींचा गड खालसा करण्यासाठी विरोधकांना जिवाचे रान करावे लागेल, यात शंका नाही.
>सौराष्ट्रमध्ये काँग्रेस दमदार
सौराष्टÑातील ४८ जागांपैकी भाजपाने १९, तर कॉँग्रेसने २८ जागा जिंकल्या. सौराष्टÑात कॉँग्रेसचा बऱ्यापैकी प्रभाव दिसून आला. दक्षिण गुजरातमध्ये ३५ पैकी भाजपाला २५ तर कॉँग्रेसला ८, कच्छमध्ये भाजपाला ४, तर कॉँग्रेसला २, मध्य गुजरातमध्ये भाजपाला २२ तर कॉँग्रेसला १७ आणि उत्तर गुजरातमध्ये भाजपाला १५ तर कॉँग्रेसला १६ जागा मिळाल्या. विधानसभा निवडणूक निकालाचा प्रभाव लोकसभा निवडणुकीतही राहिला तर भाजपाला कॉँग्रेससमोर घाम गाळावा लागणार हे निश्चित.

Web Title: Challenge BJP in the repeating of 2014 in Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.