‘आता खैरे बस्स!’ पण..., युती होणार की नाही ?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 06:27 AM2019-01-22T06:27:28+5:302019-01-22T06:27:45+5:30
औरंगाबाद लोकसभेची निवडणूक प्रतिष्ठेची बनत आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या जागेबद्दल ‘राष्ट्रवादी आग्रही असून, सतीश चव्हाण उमेदवार राहतील’, असे जाहीर केल्यापासून चुरस वाढली आहे.
- स. सो. खंडाळकर
औरंगाबाद लोकसभेची निवडणूक प्रतिष्ठेची बनत आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या जागेबद्दल ‘राष्ट्रवादी आग्रही असून, सतीश चव्हाण उमेदवार राहतील’, असे जाहीर केल्यापासून चुरस वाढली आहे. काँग्रेसला ही जागा हातातून जाते की काय, अशी भीती आहे. ही जागा आम्ही सोडणार नाही, अशी भूमिका प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण व सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.
औरंगाबाद हे सामाजिक व राजकीय चळवळीचे केंद्र आहे. वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमची झालेली दोस्ती महाराष्ट्राने बघितली. आता ओवैसी व अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी उठवलेले वादळ कुणावर धडकते, हे बघणे रंजक ठरेल. बीआरएसपीचे डॉ. सुरेश माने यांनीही औरंगाबादवर लक्ष केंद्र्रित केले आहे. आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार दिला तर मतांची विभागणी अटळ आहे. काँग्रेस आघाडीत आंबेडकर सहभागी झाले तर मग काँग्रेसची दावेदारी बळकट होईल.
खा. चंद्रकांत खैरे यांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता नाही. शिवसेना-भाजपाकडे वर्षानुवर्षे महापालिका असताना विकासाच्या बाबतीत युती अपयशीच ठरत आलेली आहे. खा. खैरे हे नेहमीच ‘हे मी केलं, ते मी केलं’ असे ऐकवत असतात; पण त्यावर लोकांचा विश्वास नाही. ऐनवेळी भावनिक प्रश्न निर्माण करून मतांची पोळी भाजून घेणे हे तंत्र यशस्वी झाल्याने खैरे यशस्वी झाले. यावेळी ‘आता खैरे बस्स’ असा सूर आहे. पक्षांतर्गत विरोधकांची संख्याही वाढली आहे. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि खैरे यांच्यातील कलगीतुरा मुख्यमंत्र्यांसमोर लोकांनी अनुभवला. युती झाली तरी हा बेबनाव खैरेंना महागात पडू शकतो. पक्षांतर्गत विरोधकांना खैरे किती एकवटू देऊ शकतात, हे महत्त्वाचे. बागडेंची प्रतिमा मलिन करण्याचा खैरेंनी प्रयत्न केला, बेछूट आरोप केले, संयम बाळगला नाही, असा मतप्रवाह आहे.
युतीवरून वरिष्ठ नेत्यांचीच ताणाताणी सुरू आहे; पण भाजपाही तयारीत आहेच. बागडे, जयसिंगराव गायकवाड, डॉ. भागवत कराड, एकनाथ जाधव, विजया रहाटकर, हीे उमेदवार म्हणून चर्चेत आहेतच.
काँग्रेसने जिल्हा निवड मंडळाची दहा उमेदवार निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे स्पष्ट केले आहे. प्रा. रवींद्र बनसोड हा नवा चेहरा यादीत आहे. अब्दुल सत्तार, डॉ. कल्याण काळे, नामदेवराव पवार यांच्यासह १२ नावे प्रदेश काँग्रेसकडे पाठविण्यात येणार आहेत. एमआयएम- वंचित बहुजन आघाडी उमेदवार जाहीर करील काय, डाव्यांकडून कॉ. भालचंद्र कांगो लढतील काय, याचीही उत्सुकता आहे. युती झाली तरी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्र येतील का? काँग्रेस- राष्टÑवादी आघाडीचा उमेदवार कोण, त्यालाही निवडून आणण्यासाठी प्रयत्न होतात काय आणि सरकारविरुद्धच्या असंतोषाचा खरा फायदा पदरात पाडून घेता येईल काय, यावरच लोकसभेच्या जागेचे भवितव्य अवलंबून आहे.
>सध्याची परिस्थिती
शिवसेनेचे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांचा मतदारसंघात सातत्याने संपर्क आहे. धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न खैरे यांच्याकडून सातत्याने होताना दिसत आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा चंद्रकांत खैरे यांच्यावर राग आहे. शिवाय शिवसेनेतील मराठा कार्यकर्त्यांचाही खैरे यांना आतून विरोध आहेच. युती होते की नाही, याकडेही दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष आहे. सध्या युतीमधील खैरे आणि विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. काँग्रेसकडून बारा जण इच्छुक आहेत. सरकारविरुद्धचा असंतोष आणि दुष्काळी परिस्थिती यासंदर्भात काँग्रेसचे कार्यकर्ते एकदिलाने काम करत आहेत, असे चित्र नाही.