स्वबळावर सरकार स्थापन करण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी सांगितला अॅक्शन प्लॅन, राज्यात सुरू करणार हे अभियान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 09:54 AM2021-07-20T09:54:49+5:302021-07-20T09:54:49+5:30
Chandrakant Patil News: राज्यात स्वबळावर सरकार स्थापन करण्यासाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना एक व्यापक अॅक्शन प्लॅन दिला आहे.
मुंबई - २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवूनही युती तुटल्याने भाजपाला विरोधी पक्षात बसावे लागले होते. ही बाब राज्यातील भाजपाच्या नेत्यांना अद्यापही सलत आहे. त्यामुळे राज्यातील सत्तेत पुन्हा विराजमान होण्यासाठी भाजपाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, राज्यात स्वबळावर सरकार स्थापन करण्यासाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी कार्यकर्त्यांना एक व्यापक अॅक्शन प्लॅन दिला आहे. (Chandrakant Patil give action plan to BJP party Workers for form a government on its own )
चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे, त्यात ते म्हणतात की, आपल्याला आता राज्यात स्वबळावर सरकार स्थापन करायचे आहे. १४० आमदार निवडून येण्यासाठी १ कोटी ७० लाख मतांची गरज असते. आपण स्व. अटल बिहारी वाजयपेयी यांच्या जयंतीपर्यंत म्हणजेच २५ डिसेंबरपर्यंत राज्यातील २ कोटी लोकांना भाजपाच्या समितीचे सदस्य करत आहोत.
आपल्याला आता स्वबळावर सरकार स्थापन करायचे आहे. १४० आमदार निवडून येण्यासाठी १ कोटी ७० लाख मतांची गरज असते. आपण स्व. अटल जी यांच्या जयंतीपर्यंत म्हणजेच २५ डिसेंबरपर्यंत राज्यातील २ कोटी लोकांना भाजपाच्या समितीचे सदस्य करत आहोत. pic.twitter.com/Wl7EuIPTNa
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) July 19, 2021
याबाबत कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये आपले १०६ आमदारा असूनही आपली मते आहेत १ कोटी ४२ लाख. १ कोटी ७० लाख मतं ज्याला मिळतात त्याला स्वबळावर सरकार स्थापन करता येते. एकट्याच्या ताकदीवर १४० जागा जिंकायच्या असतील १ कोटी ७० लाख मतं आवश्यक आहेत. आपण काय म्हणतोय की २५ डिसेंबरपर्यंत दोन कोटी लोकांना भाजपाचं सदस्य करायचं. मग १४० येतील की जास्त येतील. १ कोटी ७० लाखाला १४० जागा येतात. ३० लाख अधिक झाले. महाराष्ट्रामध्ये एकट्याने सरकार आणायचे असेल तर हे अभियान यशस्वी करावे लागेल. हे एकट्याने होणार नाही. त्यासाठी ओबीसी आघाडीने प्रयत्न केले पाहिले. आदिवासी आघाडी, जनता युवा यांनी ठरवलं पाहिजे त्यातून राज्यात भाजपाचे दोन कोटी सदस्य होतील आणि राज्यात भाजपाचं सरकार येईल.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने राज्यात स्वबळावर निवडणूक लढवली होती. त्यावेळी भाजपाला १२२ जागा जिंकण्यात यश मिळाले होते. तर २०१९ मध्ये शिवसेना आणि भाजपा यांनी युती करून निवडणूक लढवली होती. त्यावेळी भाजपाला १०५ जागा जिंकता आल्या होत्या.