मराठा आरक्षणासाठी शरद पवारांच्या पाठीही उभे राहू, चंद्रकांत पाटील यांची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2021 06:42 PM2021-06-06T18:42:25+5:302021-06-06T18:43:16+5:30
मराठा आरक्षणासाठी उद्या शरद पवारांनी जरी आंदोलन केलं तरी आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहू असं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. ते पुण्यात बोलत होते.
मराठा आरक्षणासाठी उद्या शरद पवारांनी जरी आंदोलन केलं तरी आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहू असं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. ते पुण्यात बोलत होते.
"खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. त्याचं स्वागत आहे. मराठा आरक्षणासाठी जे जे आंदोलन करतील त्यांना आमचा पाठिंबा राहील हे आम्ही आधीच सांगितलं आहे. उद्या शरद पवारांनी आंदोलन केलं तर आम्ही त्यांच्याही पाठी उभे राहू. संभाजीराजे तर आमचे राजे आहेत. त्यामुळे या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आम्ही महाराजांना मदत करायला सदैव तयार आहोत", असं मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे.
मराठा समाजाला आंदोलन मिळावं यात काहीच दुमत नाही आणि भाजपनं त्यासाठी नेटानं प्रयत्न केले आहेत. संभाजी राजेंना आमचं काही सहकार्य हवं असेल तर ते आम्ही नक्कीच करू, पण आम्ही आंदोलनात आलो तर राजकीय रंग लागू शकतो. आम्हाला संभाजी महाराजांचं नेतृत्व मान्य आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
आरक्षण रद्द झाल्यापासून पुनर्विचार याचिका दाखल करा, असं आम्ही सांगत आहोत. पण सरकारनं अजून कोणताही निर्णय घेतला नाही, अशी टीका देखील पाटील यांनी यावेळी केली.