शरद पवारांच्या पे-रोलवर राहण्यापेक्षा...; चंद्रकांत पाटील यांचा संजय राऊतांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 03:25 PM2021-06-22T15:25:36+5:302021-06-22T15:27:04+5:30
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटली यांनी पालघर दौऱ्यात केली संजय राऊत यांच्यावर टीका.
शिवसेना आणि भाजपची युती ही नैसर्गिक आहे. त्यावर संजय राऊत यांनी बोलायला हवं. त्यांनी शरद पवारांच्या पे-रोलवर राहून बोलण्यापेक्षा सर्वसामान्य शिवसैनिकांच्या व्यथा मांडाव्यात, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. ते पालघरमध्ये बोलत होते.
चंद्रकांत पाटील हे सध्या पालघर दौऱ्यावर आहेत. त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शिवसेनेवर आणि विशेषत: संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. "शिवसेना-भाजपची युती नैसर्गिक आहे. त्यावर राऊत यांनी बोलायला हवं. पवारांच्या पे-रोलवर राहून त्यांची बाजू घेण्यापेक्षा त्यांनी जनतेच्या व्यथा मांडायला हव्यात. आम्हाला हिंदुत्व हवं आहे आणि त्याच्याच रक्षणासाठी आम्ही आहोत. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनीही तोच संदेश दिला होता. पूर्वीच्या युतीत आम्ही समाधानी होतो आणि आताची युती नैसर्गिक नाही अशा शिवसैनिकांच्या व नेत्यांच्या भावाना तयार झाल्या आहेत. त्या संजय राऊत यांनी मांडल्या पाहिजेत", असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
विनायक राऊत यांनी दिलं जशास तसं प्रत्युत्तर
चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेवर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी देखील जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे. "शिवसेना-भाजपची युती नैसर्गिक होती. पण त्यावेळेला बेईमानीचा कळस भाजपने गाठला म्हणून सेनेला भाजपपासून दूर व्हावं लागलं. चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांना शहणापणा शिकवण्याची गरज नाही. स्वत:च्या बुडाखाली जे काही जळतंय ते आधी सांभाळा", असा घणाघात विनायक राऊत यांनी केला आहे. यासोबतच संपूर्ण देशात केंद्राच्या माध्यमातून ईडी आणि सीबीआय, एनआएचा वापर करुन विरोध पक्षाच्या लोकांना कसा त्रास दिला जातोय हे देखील संपूर्ण महाराष्ट्र पाहातोय, असंही राऊत म्हणाले.