"चंद्रकांतदादा, तुम्ही कुल्फी किंवा चॉकलेट मिळावं म्हणून भाजपामध्ये आला", खडसेंचं प्रत्युत्तर

By ravalnath.patil | Published: October 23, 2020 08:34 PM2020-10-23T20:34:08+5:302020-10-23T20:36:10+5:30

Eknath Khadse Reaction on Chandrakant Patil Statement : कोल्हापुरात आमदार, खासदार तर सोडा साधा पंचायत समितीचा सदस्य तरी तुम्हाला निवडून आणता येतो का? असा सवालही एकनाथ खडसेंनी चंद्रकांत पाटलांना केला आहे.

"Chandrakantdada, you came to BJP to get ice cream and chocolate", Eknath Khadse Reaction on Chandrakant Patil Statement | "चंद्रकांतदादा, तुम्ही कुल्फी किंवा चॉकलेट मिळावं म्हणून भाजपामध्ये आला", खडसेंचं प्रत्युत्तर

"चंद्रकांतदादा, तुम्ही कुल्फी किंवा चॉकलेट मिळावं म्हणून भाजपामध्ये आला", खडसेंचं प्रत्युत्तर

Next
ठळक मुद्दे"चंद्रकांतदादा तुमचा भाजपाशी संबंध तरी काय होता? तुम्ही विद्यार्थी परिषदेत होता."

मुंबई : एकनाथ खडसेंच्या समाधानासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना लिमलेटची गोळी देणार की कॅडबरी? हे पाहावे लागेल, असे म्हणत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसेंवर निशाणा साधला. याला उत्तर देताना एकनाथ खडसेंनी चंद्रकांतदादा, तुमचा भाजपाशी संबंध काय होता? तुम्ही तर कुल्फी आणि चॉकलेट मिळावं म्हणून भाजपामध्ये आला आहात, अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसेंनी 'TV9 मराठी' या वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी एकनाथ खडसेंनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला. ते म्हणाले, "भाजपाने मला काहीही फुकट दिलेलं नाही. यासाठी 40 वर्षांचे माझे आयुष्य भाजपाला दिले आहे. माझ्या मनगटाच्या जोरावर मिळविले आहे. चंद्रकांतदादा तुमचा भाजपाशी संबंध तरी काय होता? तुम्ही विद्यार्थी परिषदेत होता. काही तरी कुल्फी किंवा चॉकलेट मिळावं म्हणून तुम्ही भाजपामध्ये आला आहात. तुम्हाला सर्व फुकट मिळाले आहे," अशी टीका एकनाथ खडसेंनी केली आहे. 

याचबरोबर, कोल्हापुरात आमदार, खासदार तर सोडा साधा पंचायत समितीचा सदस्य तरी तुम्हाला निवडून आणता येतो का? असा सवालही एकनाथ खडसेंनी चंद्रकांत पाटलांना केला आहे. तसेच, भाजपामध्ये माझा छळ झाला. माझी बदनामी झाली. म्हणून मी पक्ष सोडला. काही मिळविण्यासाठी पक्ष सोडला नाही, असेही एकनाथ खडसेंनी सांगितले. 

"नाथाभाऊंना लिमलेटची गोळी देणार की कॅडबरी?"
भाजपाला रामराम ठोकल्यानंतर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. एकनाथ खडसेंच्या पक्षप्रवेशानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्यावर टीका केली. यावेळी, "खडसे यांचा दुपारी दोन वाजता प्रवेशाचा कार्यक्रम ठरला होता. मग, तो दुपारी चारपर्यंत का लांबला, हे जयंत पाटील यांनी सांगावे. नाथाभाऊंना काय द्यायचं, हे ठरलं नाही. तुमचे समाधान होईल असे देऊ एवढ्यावर शेवटी नाथाभाऊ बळंबळं नरीमन पॉईंटच्या घरातून बाहेर पडले," असे चंद्रकांत पाटील म्हणाले. याचबरोबर, "आता तुमचं समाधान होईल यामध्ये लिमलेटची गोळीनेही समाधान होते आणि कॅडबरीनेही समाधान होते. त्यामुळे आता त्यांना ते लिमलेटची गोळी देतात की कॅडबरी देतात? आणि त्यावर मनापासून समाधानी होतात नाथा भाऊ की आता काही पर्यायच नाही म्हणून जे देतील त्याच्यावर समाधानी आहेत असे म्हणतात, हे पाहावं लागेल", असे म्हणत चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादी आणि एकनाथ खडसेंवर निशाणा साधला.

एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपाला रामराम ठोकल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते एकनाथ खडसेंना प्रवेश देण्यात आला. यावेळी, राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे यांनी पुन्हा भाजपावर निशाणा साधला आहे. यावेळी एकनाथ खडसे यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. काही दिवस थांबा, कुणी किती भूखंड घेतलेत सांगतो. मी सांगतो कोणी काय केले? मला कोणालाही जाणीवपूर्वक त्रास द्यायचा नाही. परंतु, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. मी याविरोधात आवाज उठवेन, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले.
खूप संघर्ष केला. हा संघर्ष केवळ भाजपामध्येच नाही, तर अगदी मंत्रिमंडळातही केला. ४० वर्ष काढल्यानंतर एकाएकी पक्ष सोडावासा वाटला नाही. विधानसभा निवडणुकीतही मानहानी आणि छळ करण्यात आला. मी याबाबत वरिष्ठांना सभागृहात पुरावे देण्याची विनंती केली, मात्र आजवर प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, असा दावा एकनाथ खडसे यांनी यावेळी केला.

Web Title: "Chandrakantdada, you came to BJP to get ice cream and chocolate", Eknath Khadse Reaction on Chandrakant Patil Statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.