भाजप मार्गदर्शकांच्या नावे फसवणूक?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 04:48 AM2019-04-15T04:48:42+5:302019-04-15T04:49:32+5:30
भाजपचे मार्गदर्शक व कानपूरचे विद्यमान खासदार मुरली मनोहर जोशी यांच्या एका पत्राने राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली आहे.
- नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : भाजपचे मार्गदर्शक व कानपूरचे विद्यमान खासदार मुरली मनोहर जोशी यांच्या एका पत्राने राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना लिहिलेल्या या पत्रात भाजपने जोशी यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचा, तसेच लोकशाहीवादी मूल्ये पायदळी तुडविल्याचा आरोप केला आहे. याबरोबरच या दोन्ही नेत्यांच्या अपमानाचाही यात उल्लेख आहे. तथापि, जोशी यांच्या कार्यालयाने हे पत्र फेटाळून लावले आहे.
हे पत्र जारी करणाऱ्यांनी वृत्तसंस्थांच्या लोकांचाही वापर केला; परंतु संस्थांनी हा आरोप फेटाळून लावला. भाजपने या दोन्ही संस्थापक सदस्यांना या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी दिलेली नाही. आपल्याला तिकीट दिले जाणार नाही, हे स्पष्ट होताच जोशी यांनी आपल्या कानपूर मतदारसंघातील मतदारांना उद्देशून एक खुले पत्र लिहिले होते व तीव्र नाराजी व्यक्त केली होती. अडवाणी व जोशी या दिग्गज नेत्यांनी पक्षाच्या स्थापनादिनी भेटही घेतली होती. त्यावेळी हे दोन्ही नेते पक्षातील घडामोडींवर काही कठोर प्रतिक्रिया देतील, अशी चर्चा होती.
पहिल्या टप्प्याचे मतदान झाल्यानंतर आलेले हे पत्र प्रथमदर्शनी खरे मानण्यात आले होते. हे पत्र जोशींच्या अधिकृत लेटरहेडवर जारी केले होते. त्यावर १२ एप्रिल २०१९ ही तारीखही लिहिलेली आहे. या पत्राचा खरे-खोटेपणा जाणून घेण्यासाठी जोशी यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही; परंतु अशा प्रकारचे कोणतेही पत्र जारी करण्यात आलेले नाही, असे त्यांच्या कार्यालयाने सांगितले.
>अडवाणींनीही साधला निशाणा
अडवाणी यांनी यापूर्वी एका ब्लॉगच्या माध्यमातून पक्षाच्या विद्यमान कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना लोकशाही मूल्यांची आठवण करून देत म्हटले होते की, भाजपने प्रतिस्पर्ध्यांना कधीच देशद्रोही मानलेले नाही.
>भाजपला बदनाम करण्याचा कट : निवडणुकीच्या काळात भाजपला बदनाम करण्यासाठी विरोधी पक्षांनी हा कट रचला आहे, असा आरोप भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने केला. यातून पक्ष व नेत्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत आहे; परंतु जनतेने हा कट ओळखला आहे, असेही ते म्हणाले.
>अडवाणींचे बनावट टिष्ट्वटर
काही दिवसांपूर्वीच अडवाणींच्या नावाने एक टिष्ट्वटर अकाऊंट समोर आले. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या कामकाजाचे कौतुक करण्यात आले होते. एवढेच नव्हे, तर भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते फॉलोही करीत आहेत. तथापि, अडवाणी यांच्या कार्यालयाने हे बनावट असल्याचे सांगत ते बंद करण्यास सांगितले आहे.