छत्रपती खासदार संभाजीराजे- विजय वडेट्टीवार यांच्यात ओबीसीवरून पुन्हा खडाजंगी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2020 02:03 AM2020-10-11T02:03:28+5:302020-10-11T02:04:16+5:30
Maratha Reservation, OBC, Sambhaji Raje, Vijay Vaddetiwar News: या निमित्ताने दोघांमध्ये पुन्हा शाब्दिक चकमक झाली. ‘प्रसंगी तलवार काढू’ या संभाजीराजेंच्या विधानावरून आधीच दोघांमध्ये खडाजंगी झाली होती.
मुंबई : मराठा समाज ओबीसीमध्ये का येत नाही अशी विचारणा बहुजन विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपल्याला केली होती, असा दावा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केल्यानंतर ‘संभाजीराजे अर्धवट बोलले, याचा मला खेद वाटतो’ अशी प्रतिक्रिया वडेट्टीवार यांनी दिली.
या निमित्ताने दोघांमध्ये पुन्हा शाब्दिक चकमक झाली. ‘प्रसंगी तलवार काढू’ या संभाजीराजेंच्या विधानावरून आधीच दोघांमध्ये खडाजंगी झाली होती. वडेट्टीवार यांच्यामुळे मी फार दु:खी आहे. ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण नको हे मी अगदी स्पष्टपणे सांगितले आहे. वडेट्टीवार मला म्हणाले होते की ओबीसीमधून आरक्षण देण्यास तयार आहे. मी म्हणालो कृपया तसे करू नका. विजय वडेट्टीवार असे का वागत आहेत माहिती नाही, असे विधान संभाजीराजे यांनी माध्यमांशी बोलताना केले.
काय गफलत झाली...?
वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले की, माझ्या वक्तव्याचा अर्थ संभाजीराजेंनी काय घेतला किंवा त्यांची काय गफलत झाली, हे माहीत नाही. माझे वक्तव्य स्पष्ट होते. आम्ही मराठा समाजातील गरीब मुलांच्या नुकसानीच्या आड येत नाही आणि येण्याचा विषयच नाही, असे आम्ही वारंवार सांगतोय. महाराष्ट्राच्या छत्रपती शिवरायांच्या दिमतीला बहुजन समाजच होता. मराठा समाजाने ओबीसी आरक्षणात यावे, असे मी कधीही म्हटलेले नाही.
राजेंनी सर्व समाजांचा विचार करावा - भुजबळ
राजे हे कोणा एका समाजाचे व धर्माचे नसतात तर ते सर्व जनतेचे राजे असतात. त्यामुळे त्यांनी सर्व समाजाचा विचार करावा, असा टोला राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी छत्रपती संभाजीराजे यांना लगावला. त्याच बरोबर सध्या सुरू असलेले शाब्दिक वाद थांबवावेत असे मतही व्यक्त केले आहे.
सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्नावर संभाजीराजे यांनी तलवार काढू या वक्त्यव्याने वाद सुरू असून त्यावर पत्रकार परिषदेत बोलताना भुजबळ यांनी, राजे तलवारीचा उपयोग ओबीसी वर करतात की आदिवासीवर हा प्रश्न उपस्थित होत असून, मराठा-ओबीसी हे भांडण आता थांबायला हवे, तलवारी नाही पण शब्दांची खणखण देखील थांबायला हवी अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
मराठा समाजाला विविध सवलती एसईबीसीअंतर्गत शासनाचा आदेश जारी
सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागास (एसईबीसी) प्रवर्गातील घटकांसाठी राज्य शासनाने विविध सवलती दिल्या आहेत. मराठा समाजाला त्याचा मोठा फायदा होईल. राज्य मंत्रिमंडळाने या बाबत निर्णय घेतला होता. त्याची अंमलबजावणी करणारा आदेश काढण्यात आला आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या बाबत नुकताच निर्णय घेण्यात आला होता.राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना पूर्वी एसईबीसी विद्यार्थ्यांसाठी होती. ती एसईबीसीसाठी जशीच्या तशी लागू करण्यात आली आहे. डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना पूर्वी एसईबीसी प्रवगार्साठी लागू होती ती तशीच आता एसईबीसीसाठी लागू झाली आहे.
सारथी संस्थेसाठी १३० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे बेरोजगार तरुणांना व्यवसायाठी आर्थिक मदत देण्यात येत आहे, त्यास अतिरिक्त निधीची आवश्यकता भासल्यास त्याचीही तरतूद करण्यास मान्यता मिळाली आहे.मराठा आरक्षण आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना एक महिन्याच्या आत एसटी महामंडळात नोकरी दिली जाईल. सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली विशेष अनुज्ञा याचिका व इतर याचिकांमधील निर्णयाच्या तसेच राज्य शासनाने या कामी देण्यात आलेली अंतरिम स्थगिती उठवण्याकरीता दाखल केलेल्या अर्जाच्या निर्णयाच्या अधीन हे आदेश असतील, अंतरिम स्थगिती उठविण्याच्या अर्जाच्या अंतिम निकालापर्यंत हे आदेश लागू राहतील असेही यात नमूद केले आहे.