मुख्यमंत्र्यांनी अजून थोडी उदारता दाखवावी - पंकजा मुंडे
By ravalnath.patil | Published: October 25, 2020 03:11 PM2020-10-25T15:11:15+5:302020-10-25T15:11:56+5:30
Pankaja Munde Dasara Melava : मी महाराष्ट्रभर दौरा काढणार आहे, ज्याच्या डोळ्यात अश्रू आहेत. त्या माणसासोबत पंकजा मुंडेला आणि त्यांच्या कार्यकर्त्याला पोहोचावे लागणार आहे, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.
बीड : विजयादशमीच्या मुहुर्तावर आज सावरगाव घाट येथे आयोजित दसरा मेळाळ्यात भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहा हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले, परंतु हे पॅकेज पुरेसं नाही. मुख्यमंत्र्यांनी अजून थोडी उदारता दाखवावी, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
दसऱ्या मेळाव्याच्या निमित्ताने पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना ऑनलाइन मार्गदर्शन केले. यावेळी, उद्धव ठाकरेंनी 10 हजार कोटींचं पॅकेज घोषित केले. मी त्यांचं स्वागत करते. मात्र शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी हे पॅकेज पुरेसं नाही. शेतकऱ्यांचे अत्यंत हाल झाले आहेत. शेतकऱ्यांसाठी योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा विरोधी पक्षांना रस्त्यावर उतरावे लागेल, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले.
कुणीतरी म्हटलं उसतोड कामगारांचे निर्णय मुंबईत बसून होत नाही. उसतोड कामगारांचे निर्णय धाब्यावर बसून होतात का? उसतोड कामगारांचे निर्णय घेण्यासाठी फडातच जावे लागत असे नाही. पंकजा मुंडेंच्या विरोधात स्टेटमेंट केले की हेडलाईन होते. मुंडे साहेब साखर कारखानदार होते ते पण ऊसतोड कामगारांचे नेतृत्व करायचे. ऊसतोड कामगार स्वाभिमानी आहेत. २७ तारखेच्या बैठकीत जो निर्णय होईल ते जाहीर करा नाहीतर उसाच्या फडातून कामगार बाहेर आणू, असा इशारा पंकजा मुंडे यांनी दिला आहे.
'‘आपला दसरा';'
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) October 25, 2020
भगवान भक्तीगड, सावरगाव. #Live#AaplaDasra2020https://t.co/sAEhNaGtpc
याचबरोबर, निवडणुकीत हरले. माझ्यापेक्षा पराभूत माझे कार्यकर्ते वाटते. मी म्हटले काय तुम्ही मनावर घेतलंय. साहेब आपल्यातून गेले. यापेक्षा मोठी घटना आहे का ही. 'जिंदगी की रेस में जो लोग आपको दौडकर हरा नहीं सकते. वो आपको तोडकर हराने में लगते है.' मी या रेसमध्ये जीव तुटेपर्यंत पळत राहील, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. भगवानगडावर जाण्यापूर्वी पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर जाऊन नमस्कार केला. दसऱ्या मेळाव्याच्या निमित्ताने भगवानबाबांच्या 25 फुटी मूर्तीला फुलांची सजावट करण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर भगवान बाबा स्मृतिस्थळ परिसरात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
महाराष्ट्रभर दौरा काढणार
मी महाराष्ट्रभर दौरा काढणार आहे, ज्याच्या डोळ्यात अश्रू आहेत. त्या माणसासोबत पंकजा मुंडेला आणि त्यांच्या कार्यकर्त्याला पोहोचावे लागणार आहे, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.