फोन टॅपिंग प्रकरणावर मुख्यमंत्र्यांचा संताप, कॅबिनेटमध्ये केले मोठे विधान, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 08:38 PM2021-03-24T20:38:35+5:302021-03-24T20:41:29+5:30
CM Uddav Thackeray's reaction on phone tapping issue : फोन टॅपिंगवरून केलेल्या दाव्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. या प्रकरणात विरोधी पक्षांकडून होत असलेल्या आरोपांना उत्तर देताना महाविकास आघाडीच्या नेत्यांची दमछाक होत आहे.
मुंबई - परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर केलेले गंभीर आरोप आणि नंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी फोन टॅपिंगवरून केलेल्या दाव्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. या प्रकरणात विरोधी पक्षांकडून होत असलेल्या आरोपांना उत्तर देताना महाविकास आघाडीच्या नेत्यांची दमछाक होत आहे. दरम्यान, फोन टॅपिंग प्रकरणाचे आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही पडसाद उमटले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणावर संताप व्यक्त करत मोठे विधान केले आहे. (Chief Minister Uddav Thackeray anger over phone tapping issue, big statement made in cabinet, said ...)
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये फोन टॅपिंग प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले. यावेळी फोन टॅपिंग प्रकरणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. अधिकाऱ्यांना ओळखण्यात आपण कमी पडलो. फोन टॅप होत असतील तर कामं करायची कशी आणि अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवायचा कसा, अशा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच देवेंद्र फडवणीस यांनी केलेले आरोप आपण एकजुटीने खोडून काढले पाहिजेत, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
दरम्यान, आजच्या कॅबिनेटला गृहमंत्री अनिल देशमुख उपस्थित होते. त्यांनी या प्रकरणाची माहिती कॅबिनेटला दिली. काही अधिकाऱ्यांनी गंभीर चुका केल्या असून, त्यांच्यावर आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे देशमुख यांनी सांगितल्याची माहिती कॅबिनेटच्या बैठकीनंतर नवाब मलिक यांनी दिली.
तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. रश्मी शुक्लांनी वेगळ्याच नाव्यांनी परवानग्या घेऊन अनेक मंत्र्यांचे फोन टॅपिंग केल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारादेखील त्यांनी दिला.