"हे बघा आमदार खासदार पाच महिन्याचा पगार देतील...", मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात भास्कर जाधवांचा तिळपापड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 09:03 PM2021-07-25T21:03:57+5:302021-07-25T21:09:41+5:30
Chiplun Flood : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी चिपळूणमधील पूरग्रस्त भागाची पाहणी केली आणि शहरवासियांच्या व्यथा जाणून घेतल्या.
रत्नागिरी : मुसळधार पाऊस आणि त्यानंतर आलेल्या महापुरामुळे कोकणातील चिपळूण शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. सुदैवाने मोठी जीवितहानी झाली नसली तरी प्रचंड वित्तहानी झाली आहे. शहरातील बाजारपेठ पुरामुळे कोलमडली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी चिपळूणमधील पूरग्रस्त भागाची पाहणी केली आणि शहरवासियांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी भर बाजारपेठेत एक महिला पुरात तिच्या घराचे आणि दुकानाचे नुकसान झाल्याचे ओरडून ओरडून सांगत होती.
या महिलेने तुम्ही काहीपण करा, आमदार, खासदारांचा एक महिन्याचा पगार फिरवा, पण आमचे नुकसान भरून द्या, असे मुख्यमंत्र्यांना सांगितले. महिलेच्या या उद्गाराने आमदार भास्कर जाधवांचा तिळपापड झाला. त्यांनी लगेच या महिलेला प्रत्युत्तर दिले. हे बघा आमदार खासदार पाच महिन्याचा पगार देतील. त्याने काही होणार नाही, असे भास्कर जाधव म्हणाले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या भेटीपेक्षा भास्कर जाधव यांच्या या वागण्याचीच चर्चा अधिक रंगली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळूणमधील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी व्यापाऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. तसेच अधिकाऱ्यांकडून पूर परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी परिवहन मंत्री अनिल परब, मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर आणि मुख्य सचिव सीताराम कुंटे उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांसमोर चिपळूणवासीयांनी तीव्र शब्दात व्यक्त केल्या व्यथा pic.twitter.com/JSLPhwOz70
— Lokmat (@MiLOKMAT) July 25, 2021
यावेळी पुराच्या काळात आम्हाला मदत मिळाली नाही. पूरपरिस्थितीदरम्यान, मदतीसाठी झालेल्या उशिरासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी चिपळूणवासियांनी केली. तसेच पुरामुळे आम्ही उद्ध्वस्त झालो आहोत. आम्हाला या परिस्थितीतून सावरण्यासाठी एकदा कर्जमाफी द्या आणि दोन टक्के दराने कर्ज द्या अशी विनंती चिपळूणमधील व्यापाऱ्यांनी केली.
त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला तुमच्या पायावर कसे उभे करायचे याची जबाबदारी आम्ही घेत आहोत, असे सांगितले. तसेच, तुमचे जे नुकसान झाले आहे. त्याची काळजी करु नका. तुम्हाला तुमच्या पायावर उभे करण्याची जबाबदारी सरकारची आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळूणमधील व्यापाऱ्यांना दिले.
त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ताफा थोडा पुढे सरकला. भर बाजारपेठेत एक महिला पुरात तिच्या घराचे आणि दुकानाचे नुकसान झाल्याचे ओरडून ओरडून सांगत होती. मदतीची याचना करत होती. ही मला रडतच आपल्या भावना व्यक्त करत होती. तिचा हा आक्रोश ऐकून मुख्यमंत्री थोडावेळ थांबले. तिचे म्हणणे ऐकून घेतले आणि सर्व मागण्या पूर्ण करू असे तिला आश्वासन दिले. यावेळी या महिलेने तुम्ही काहीपण करा, आमदार, खासदारांचा एक महिन्याचा पगार फिरवा, पण आमचे नुकसान भरून द्या, असे सांगितले.
या महिलेच्या या उद्गाराने भास्कर जाधवांचा तिळपापड झाला. त्यांनी लगेच या महिलेला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. हे बघा आमदार खासदार पाच महिन्याचा पगार देतील. त्याने काही होणार नाही. चला चला… बाकी काय… तुझा मुलगा कुठंय… अरे आईला समजव… आईला समजंव… उद्या ये…, असे भास्कर जाधव तावातावाने म्हणाले आणि पुढे निघाले. यावेळी भास्कर जाधव यांचे हातवारे, त्यांचा चढलेला आवाज आणि त्यांची बॉडी लँग्वेज पाहून उपस्थितांना थोडा धक्काच बसला. त्यामुळे चिपळूनमधील मुख्यमंत्र्यांच्या भेटीपेक्षा भास्कर जाधव यांच्या या वागण्याचीच सर्वत्र चर्चा होत असल्याचे दिसून आले.