मातोश्रीवर मध्यरात्रीपर्यंत उद्धव ठाकरे, मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा रंगली; युतीची रणनिती ठरली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 04:08 AM2019-03-13T04:08:23+5:302019-03-13T07:00:58+5:30
लोकसभा निवडणुकीची निश्चित करण्यासाठी मध्यरात्रीपर्यंत बैठक
- मनोहर कुंभेजकर
मुंबई: युतीची रणनिती ठरवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आज उशिरा मध्यरात्री पर्यंत मातोश्रीत चर्चा रंगली. गेल्या 17 फेब्रुवारीला वरळी येथे युतीची घोषणा करण्यापूर्वी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मातोश्रीत आले होते.
युतीची घोषणा केल्यावर आज मुख्यमंत्री दुसऱ्यांदा मातोश्रीवर आले ते लोकसभा निवडणुकीची रणनिती ठरवण्यासाठी. लोकसभा निवडणुकीत शिवसेना २३, तर भाजपा २५ जागा लढवणार आहे. त्यामुळे यापुढे युतीच्या उमेदवारांचा प्रचार एकदिलाने करण्यासाठी शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी प्रचाराच्या सुरुवातीलाच युतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे एकत्र मेळावे आयोजित केले आहेत. येत्या १५, १७ आणि १८ मार्च रोजी हे मेळावे महाराष्ट्रात सहा वेगवेगळ्या जिल्ह्यांत होणार आहे. तसेच पदाधिकाऱ्यांच्या या मेळाव्यांनंतर महाराष्ट्रातील युतीचा सर्वात मोठा महामेळावा आयोजित केला जाणार आहे. त्याची घोषणाही येत्या दोन दिवसांत होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी लोकमतला आज मध्यरात्री दिली.
या बैठकीला शिवसेनेकडून उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. तर भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. या बैठकीत ठरलेल्या रणनितीप्रमाणे भाजपा व शिवसेना पदाधिकाऱ्यांचा पहिला मेळावा येत्या शुक्रवारी दि १५ मार्च रोजी दुपारी अमरावतीला होणार असून दुसरा पदाधिकारी मेळावा १५ मार्चला रात्री नागपूरला होणार आहे. युतीचा तिसरा मेळावा येत्या रविवारी म्हणजेच १७ मार्चला दुपारी औरंगाबादला होणार असून याच दिवशी युतीचा चौथा मेळावा रात्री नाशिकला होणार आहे. युतीचा पाचवा मेळावा सोमवारी म्हणजेच १८ मार्चला दुपारी नवी मुंबईत होणार असून याच दिवशी युतीचा सहावा मेळावा रात्री पुण्यात होणार असल्याचे या बैठकीत ठरले.