...अन् मुख्यमंत्री नितीश कुमारांनी महिला भाजपा आमदाराला 'सुंदर' म्हटलं; विरोधकांनी घेरलं
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2021 05:10 AM2021-12-05T05:10:41+5:302021-12-05T05:11:35+5:30
दारूबंदीमुळे मोहाची पारंपरिक दारू गाळणारे लोक बेरोजगार झाले असून सरकारने त्यांना पर्यायी रोजगार द्यायला हवा, असे निक्की यांनी सांगितले.
पाटणा : राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (रालोआ) एका बैठकीत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे भाजप आमदार निक्की हेम्ब्रोम यांना ‘सुंदर’ म्हणाले. त्यामुळे निक्की यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून पक्ष नेतृत्वाकडे नितीशकुमार यांची तक्रार केली आहे.
निक्की हेम्ब्रोम यांनी म्हटले की, नितीशकुमार यांच्या वर्तनाने मी प्रचंड दुखावले आहे. ते जे काही म्हणाले, ते आक्षेपार्ह आहे. शिवाय, ते वारंवार तसे बोलत राहिले. मी पक्ष नेतृत्वास याबाबत कळविले आहे. माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, रालोआच्या एका बैठकीत भाजपा आमदार कटोरिया निक्की हेम्ब्रोम या बिहारातील दारूबंदीवर बोलत होत्या. दारूबंदीमुळे मोहाची पारंपरिक दारू गाळणारे लोक बेरोजगार झाले असून सरकारने त्यांना पर्यायी रोजगार द्यायला हवा, असे निक्की यांनी सांगितले. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी त्यांचे भाषण मध्येच थांबवून त्यांना ‘सुंदर’ म्हटले. मोहाची दारू गाळणाऱ्या आदिवासींसाठी सरकारने आधीच अनेक योजना सुरू केल्या आहेत, हे ‘सुंदर’ आमदारांस माहीत नाही, असे नितीशकुमार म्हणाले. हेम्ब्रोम यांनी शुक्रवारी बिहार विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करून नितीशकुमार यांच्या शेऱ्यास आक्षेप घेतला.
टीकेची झोड
या प्रकारावरून विरोधकांनीही नितीशकुमार यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. राजद सुप्रीमो लालूप्रसाद यादव यांच्या कन्या रोहिणी आचार्य यांनी म्हटले की, ‘या वयातही चाचा कुप्रसिध्द आहेत!’