CM शिंदे दक्ष, नाराजांवर लक्ष! विधानसभेआधी तीन नेत्यांचे राजकीय पुनर्वसन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 07:00 PM2024-09-16T19:00:36+5:302024-09-16T19:02:23+5:30
Eknath Shinde Maharashtra Vidhan Sabha : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीत तिकीट कापल्या गेलेल्या आणि मंत्रिपदाच्या प्रतिक्षेत असलेल्या तीन नेत्यांचे राजकीय पुनर्वसने केले. तीन नेत्यांची मंत्रिपदाचा दर्जा असलेल्या मंडळांवर नियुक्ती करण्यात आली आहे.
Eknath Shinde Shiv Sena News : विधानसभा निवडणुकीवर लक्ष्य केंद्रीत केलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षातील काही नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी पावले उचलली आहेत. लोकसभा निवडणुकीत तिकीट कापण्यात आलेल्या आणि मंत्रिपदाच्या प्रतिक्षेत असलेल्या नेत्यांना संयमाचे फळ शिंदेंनी दिले. माजी खासदार आनंदराव अडसूळ, माजी खासदार हेमंत पाटील आणि आमदार संजय शिरसाट यांची वेगवेगळ्या महामंडळाच्या अध्यक्ष पदांवर नियुक्ती करण्यात आली आहे. या पदांना मंत्रिपदाचा दर्जा आहे.
विधानसभा निवडणुकीआधी पक्षातील नाराजी दूर करण्यासाठी शिंदेंकडून पावले उचलली जात आहेत. रामटेक लोकसभा मतदारसंघातून तिकीट कापण्यात आलेल्या कृपाल तुमाने यांना विधान परिषदेवर घेत शिंदेंनी राजकीय पुनर्वसन केले. त्यानंतर आता अमरावती आणि हिंगोलीच्या माजी खासदारांचे पुनर्वसन करण्यात आले आहे.
आनंदराव अडसूळ, हेमंत पाटील यांना मंत्रिपदाचा दर्जा
अमरावती लोकसभा मतदारसंघातून आनंदराव अडसूळ निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. पण, भाजपाने दावा करत नवनीत राणा यांना उमेदवारी दिली. त्यामुळे अडसूळ नाराज झाले. अनेकदा त्यांनी त्यांची नाराजी बोलून दाखवली.
आनंदराव अडसूळ यांची महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हिंगोलीतून तिकीट कापण्यात आलेल्या हेमंत पाटील यांची हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे असलेल्या बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या पदाला मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे.
मंत्रिपदाच्या प्रतिक्षेत असलेले शिरसाट सिडकोचे अध्यक्ष
शिवसेनेचे प्रवक्ते आणि औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट यांची सिडको अर्थात शहर व औद्योगिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या पदाला मंत्रिपदाचा दर्जा आहे.
शिवसेनेतील बंडानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणाऱ्या नेत्यांपैकी एक संजय शिरसाट होते. महायुती सरकार स्थापन झाले, त्यावेळी शिरसाट यांना मंत्रिपद मिळेल, असे म्हटले जात होते. मंत्रिमंडळ विस्तारात त्यांची मंत्रिपदी वर्णी लागेल, असेही म्हटले गेले. अखेर शिंदेकडून त्यांचे सिडको अध्यक्षपदी पुनर्वसन करण्यात आले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या तिन्ही नेत्यांच्या नियुक्त्या महत्त्वाच्या मानल्या जात आहे.