"हिंदुत्व सिद्ध करण्याची गरज नाही म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व मदरसे बंद करावेत"
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2020 05:00 AM2020-10-16T05:00:45+5:302020-10-16T07:03:31+5:30
मदरसे व तेथील मौलवींना दिली जाणारी आर्थिक मदत तत्काळ थांबवून अल्पसंख्याक समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती स्वरूपात थेट मदत द्यावी, अशी मागणीसुद्धा आमदार अतुल भातखळकर यांनी केली.
मुंबई : हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी आम्हाला कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी धर्मांध शिक्षण देणारे राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याचे धाडस दाखवावे, अशी मागणी भाजपचे नेते व कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.
महाराष्ट्रातील मदरसे वाढविण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो, त्यातून कोणतेही आधुनिक शिक्षण न देता केवळ एका विशिष्ट धर्माचे शिक्षण दिले जाते. राज्यातील करदात्यांच्या पैशावर चालणारे हे प्रकार अत्यंत चूक असून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील मदरसे व तेथील मौलवींना दिली जाणारी आर्थिक मदत तत्काळ थांबवून अल्पसंख्याक समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती स्वरूपात थेट मदत द्यावी, अशी मागणीसुद्धा आमदार अतुल भातखळकर यांनी केली.
शिया वक्फ बोर्डाचे चेअरमन वसीम रिजवी यांनी तर मदरशांना आतंकवादी संघटनांकडूनसुद्धा पैसे पुरविले जात असल्याने, सर्व राज्यांनी मदरशांवर बंदी घालून अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण देण्याची सोय करावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कोणाच्याही दबावाला बळी न पडता धाडसी निर्णय घ्यावा, अशी मागणीसुद्धा भातखळकर यांनी केली. काल आसाम सरकारने आसाममधील सर्व सरकारी मदरसे बंद करण्याचा निर्णय घेतला, त्यांच्या या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले आहे. भातखळकर यांनी केलेल्या मागणीची अंमलबजावणी होते की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.