आणीबाणीवरून खडाजंगी; मुख्यमंत्री ठाकरे, देवेंद्र फडणवीसांमध्ये जुंपली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2020 04:04 AM2020-12-14T04:04:37+5:302020-12-14T06:56:36+5:30

राज्यात अघोषित आणीबाणी असून सरकार विरोधात बोलणाऱ्यांना तुरुंगात टाकले जात आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. तर महाराष्ट्रात जर अघोषित आणीबाणी असेल तर मग देशात घोषित आणीबाणी आहे का? असा सवाल करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्या टीकेला उत्तर दिले.

cm uddhav thackeray and bjp leader devendra fadnavis slams each other over emergency | आणीबाणीवरून खडाजंगी; मुख्यमंत्री ठाकरे, देवेंद्र फडणवीसांमध्ये जुंपली

आणीबाणीवरून खडाजंगी; मुख्यमंत्री ठाकरे, देवेंद्र फडणवीसांमध्ये जुंपली

Next

मुंबई : राज्य विधिमंडळाचे दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असून अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला अघोषित आणीबाणीवरून सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार खडाजंगी झाली. राज्यात अघोषित आणीबाणी असून सरकार विरोधात बोलणाऱ्यांना तुरुंगात टाकले जात आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. तर महाराष्ट्रात जर अघोषित आणीबाणी असेल तर मग देशात घोषित आणीबाणी आहे का? असा सवाल करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्या टीकेला उत्तर दिले. दिल्लीत भर थंडीत शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यांच्यावर थंड पाण्याचे फवारे मारले जात आहेत. ही काय सद्भावनेची गोष्ट आहे का? असा सवालही ठाकरेंनी विचारला आहे.

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर भाजप नेत्यांनी बहिष्कार टाकला. राजकीय मेळावे, कार्यक्रम सुरू झाले असताना अधिवेशनाला विरोध, ही भूमिका अनाकलनीय आहे. मागच्या अधिवेशनाप्रमाणे यावेळीही सत्ताधाऱ्यांच्या गोंधळात वेळ वाया जाण्याची शक्यता फडणवीस यांनी बोलून दाखविली. ओबीसींच्या प्रश्नावरूनही ठाकरे आणि फडणवीस यांच्यात खडाजंगी झाली. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावला तर भाजप रस्त्यावर येऊन आंदोलन करेल, असा इशारा फडणवीस यांनी दिला तर, ओबीसींच्या तोंडातील घास हिरावून घेण्याचा प्रश्नच नाही. विरोधी पक्षांनी ओबीसींना उगाच चिथावणी देऊन सामाजिक सलोखा बिघडवू नये, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकावे यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावण्याचा प्रश्नच नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मुंबई बँकेची चौकशी करून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना तुरुंगात टाकण्याच्या हालचाली सुरू आहेत, या फडणवीस यांच्या आरोपावर मुख्यमंत्री म्हणाले की कदाचित दरेकर यांना तुरुंगात टाकावे, असे फडणवीस यांना सुचवायचे असावे. फडणवीस यांना पक्षात कोण हवे, नको हे कळेनासे झाले आहे, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.

मुंबईत सर्वांसाठी लोकल रेल्वेसेवा सुरू करण्याबाबत रेल्वे प्रशासनाशी चर्चा सुरू आहे. लवकरच निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
महाविकास आघाडीतील पक्ष ठरवून राजकीय नाट्य करत आहेत. मराठा, ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर जाणीवपूर्वक  विसंगत भूमिका वठविल्या जात आहेत. एक पक्ष बाजूने बोलतो, दुसरा विरोधात आणि तिसरा तटस्थ अशी विसंगत भूमिका रंगवली जात आहे. त्यातून समाजात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला. कधी नव्हे ती आज राज्याची सामाजिक घडी विस्कटत आहे. राज्य सरकारने ठोस भूमिका न घेतल्याने मराठा आरक्षणाचा तिढा निर्माण झाला. या प्रश्नावर सरकारमध्ये एकवाक्यता नाही, गांभीर्य नाही.

देशात सध्या भयंकर स्थिती : ठाकरे
महाराष्ट्रात आणीबाणीची स्थिती असल्याचे फडणवीसांना वाटते, पण शेतकऱ्यांना अतिरेकी, पाकिस्तानी, चिनी म्हणणारे तर आणीबाणीपेक्षाही भयंकर वागताहेत, त्यांच्या न्याय्य हक्कांबद्दल बोलणाऱ्यांना देशद्रोही ठरविले जात आहे, अशी जोरदार टीका ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली.
राज्यात अघोषित आणीबाणी असल्याचे फडणवीसांना वाटते, मग दिल्लीत जे चाललंय ते तर आणीबाणीपेक्षाही भयंकर आहे, असे सांगत ठाकरे यांनी कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे असल्याचे राज्यातील भाजप नेत्यांनी दिल्लीतील आंदोलकांसमोर जाऊन सांगावे, असे आव्हान विरोधकांना दिले.
देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा आज पडलेला दिसत होता. विधान परिषद निवडणूक निकालाचा हा परिणाम दिसतो, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला. 

राज्यात अघोषित आणीबाणी- देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी लागू आहे. अर्णब गोस्वामी आणि कंगना यांच्या प्रकरणात खरे तर ठाकरे सरकारला चपराक बसली तरीही कुणीही सरकारविरोधात बोलले की, त्याला कुठल्या तरी केसमध्ये अडकवायचे प्रकार सुरू आहेत, असा आरोप  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.  
फडणवीस यांनी शेतकरी, कोरोना काळातील बळी व भ्रष्टाचार, महिलांवरील वाढते अत्याचार, मराठा आणि ओबीसी आरक्षण तसेच विकासकामांच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीका केली.  राजकीय आकसापोटी चांगल्या योजना बंद केल्या जात आहेत. समृद्धी महामार्गाला आधी विरोध केला. व आता त्याला बाळासाहेबांचे नाव दिले. हवे तर आमच्या सर्व प्रकल्पांना तुमची नावे द्या. पण, चांगल्या योजना चालू ठेवा, असे फडणवीस म्हणाले.

Web Title: cm uddhav thackeray and bjp leader devendra fadnavis slams each other over emergency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.