मराठा, ओबीसी आरक्षणावरून जुगलबंदी; ठाकरे, फडणवीसांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2020 06:28 AM2020-12-16T06:28:44+5:302020-12-16T06:50:55+5:30

फडणवीस यांनी सरकारवर केले अनेक आरोप; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची जोरदार उत्तरे

cm uddhav thackeray and bjp leader devendra fadnavis slams each other over maratha obc reservation | मराठा, ओबीसी आरक्षणावरून जुगलबंदी; ठाकरे, फडणवीसांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

मराठा, ओबीसी आरक्षणावरून जुगलबंदी; ठाकरे, फडणवीसांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

Next

मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार कधी पडणार, यासाठी कुंडल्या, पत्रिका बघणारे आता त्याच सरकारच्या प्रगतीचे पुस्तक वाचू लागले आहेत, हा बदल काही कमी नाही, असा सणसणीत टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला. मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कोणत्याही समाजाचे आरक्षण कमी होणार नाही, अशी ग्वाही ठाकरे यांनी दिली.

विधानसभेत पुरवणी मागण्यांच्या अनुषंगाने, उपस्थित झालेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते. मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात असून सर्वोच्च न्यायालयातील लढा सर्वांच्या सहकार्यातून निश्चितच जिंकू, असा विश्वास व्यक्त करून ठाकरे पुढे म्हणाले, मराठा आरक्षणाच्या बाबतीत राज्य शासनाच्या भूमिकेत अजिबात बदल झालेला नसून पूर्वीचे वकीलही बदलण्यात आलेले नाहीत. मराठा संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा सुरू आहे. मराठा समाजाला न्याय मिळवून देताना ओबीसी आरक्षणाला अजिबात धक्का लागणार नाही, हा आपला शब्द असल्याचेही त्यांनी सभागृहात ठामपणे स्पष्ट केले. आरक्षणावरून जे कोणी राज्यात, जाती-जातींत फूस लावण्याचे प्रयत्न करीत आहेत, ते वेळीच रोखावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.

बुलेट ट्रेनचा आग्रह कोणी धरला होता?
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाचा धागा पकडत ठाकरे यांनी भाजपवर चौफेर हल्ला केला. पंतप्रधानांनी आम्हाला कोरोना लसीसंदर्भात सादरीकरण केले. मात्र ही लस कधी येणार, कशी येणार, कधी देणार हे शेवटपर्यंत सांगितले नाही. ठाकरे यांनी मेट्रो कारशेडबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली. जे जे महाराष्ट्रात आहे त्यावर पहिली मालकी महाराष्ट्राची आहे. वाढवण बंदर, बुलेट ट्रेन कोणाच्या फायद्याची होती? त्यासाठी कोणी आग्रह धरला होता? कोणी मागणी केली होती? मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनने किती जण प्रवास करणार? याची उत्तरे तुम्ही कधी दिलीत का? असे प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केले.

ईडी, सीबीआयला नोकरांसारखे वागवू नका
विरोधाला विरोध करू नका. त्यामुळे राज्याला मातीत घालण्याचे राजकारण करू नका. शेतकऱ्यांचे मुद्दे मांडताना त्यांना देशद्रोही ठरवणे, खलिस्तानवादी म्हणणे, ही कसली संस्कृती आहे? मी अघोषित आणीबाणीबद्दल काही बोलणार नाही? मात्र देशात काय चालू आहे? एखाद्या विरोधकाने काही प्रश्न उपस्थित केले तर त्याच्यावर ईडी, सीबीआय यांच्या चौकश्या लावणे हे विकृत राजकारण आहे. प्रताप सरनाईक यांना आणि त्यांच्या मुलाला ईडीची नोटीस पाठवली. त्यांना लहान नातू असता तर त्यालाही नोटीस पाठवली असती. ईडी आणि सीबीआय या मोठी प्रतिष्ठा असणाऱ्या संस्था आहेत. त्यांना नोकरांसारखे वागवू नका, असा सल्लाही ठाकरे यांनी केंद्र सरकारला दिला.

प्राचीन मंदिरांचे संवर्धन करणार
प्राचीन मंदिरे हा राज्याचा सांस्कृतिक वारसा असून हे वैभव जपण्याच्या दृष्टीने या मंदिरांच्या संवर्धनासाठी राज्य शासनाकडून स्वतंत्र निधी देण्यात येईल, अशी घोषणाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली. या निर्णयावरून आम्ही आमचे हिंदुत्व सोडलेले नाही हे तुमच्या लक्षात आले असेल, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला.

मराठा आरक्षणावर राज्य सरकार जाणूनबुजून दुर्लक्ष करतेय- फडणवीस
मुंबई : मराठा आरक्षणावर राज्य सरकार जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे. ओबीसी आरक्षणाबाबत राज्यातील मंत्रीच प्रश्न निर्माण करीत आहेत. मोर्चे काढत आहेत. धनगर समाजाकडे दुर्लक्ष केले जाते आहे, असा हल्लाबोल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत केला. विधानसभेतील पुरवणी मागण्यांवरील चर्चेवर ते बोलत होते.

सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मोठा गाजावाजा करून प्रकाशित केलेले पुस्तक ‘महाराष्ट्र थांबला नाही, महाराष्ट्र थांबणार नाही’ हे वाचल्यानंतर या सरकारचा कारभार ‘घोषणा थांबणार नाही अन् अंमलबजावणी होणार नाही’ असा असल्याचे स्पष्टपणे दिसते, अशी टीका करून ते म्हणाले, सारथीला निधी दिला, असे सरकारकडून सांगितले जाते. पण हा निधी कधी दिला? ती संस्था बंद केल्यावर, की खाते काँग्रेसकडून राष्ट्रवादीकडे आल्यावर? आज सारथी अंतर्गत सुरू असलेल्या सर्वच योजना बंद आहेत. शेती कायदे करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य (पान ५ वर)

कंगना, अर्णवशी सहमत नाही, पण...
अर्णव गोस्वामी यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांबद्दल, आदित्य ठाकरेंचा ज्या पद्धतीने उल्लेख केला त्याच्याशी आणि कंगना रनौतच्या मुंबई, महाराष्ट्राबद्दलच्या विधानाशी मी अजिबात सहमत नाही, पण या दोघांवर ज्या पद्धतीने आकसाने कारवाई करण्यात आली आणि हे मी नाही न्यायालयानेही म्हटले आहे ती योग्य होती का, असा सवाल फडणवीस यांनी केला. एकूणच सरकार म्हणून आपण कसे वागतो, हे महत्त्वाचे आहे. कायद्याच्या राज्यात कायद्यांनीच उत्तर द्यायचे असते. आज कुणी काहीही लिहिले, तर अटक झाल्याशिवाय राहत नाही. ही सरकारची सिलेक्टिव कारवाई आहे. विरोधी पक्षावर कुणी बोलले, तर कारवाई नाही आणि सरकारवर बोलले की अटक. हा सत्तेचा दुरुपयोग आहे. हे कायद्याचे राज्य आहे, पाकिस्तान नाही. ही लोकशाही आहे. तानाशाही नाही, याचे भान सरकारने ठेवावे, असेही फडणवीस यांनी सुनावले. 

कोरोनातील भ्रष्टाचारावर पुस्तिका
कोरोनासंबंधीच्या शासकीय खरेदीत आणि कंत्राटांमध्ये कोट्यवधी रुपयांचे घोटाळे झाल्याचा आरोप करून देवेंद्र फडणवीस यांनी तो उघड करणारी पुस्तिका लवकरच आम्ही काढू, असे सांगितले. प्रेताच्या टाळूवरील लोणी खाणारे कोण होते, विनाटेंडर कामे कशी दिली गेली ते त्यातून कळेल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

जलयुक्तची चौकशी कराच
जलयुक्त शिवार योजनेची चौकशी कराच. या योजनेत तब्बल पाच लाख कामे झाली, केवळ ७०० तक्रारी आल्या, त्याची सरकार चौकशी करणार आहे. तुम्ही चौकशी करा, पण पाच हजार गावांमध्ये या योजनेने कसे परिवर्तन घडविले याची पुस्तिका आम्ही लवकरच काढणार आहोत, असे फडणवीस म्हणाले.

Web Title: cm uddhav thackeray and bjp leader devendra fadnavis slams each other over maratha obc reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.