पाटील, राऊतांची सूचकं विधानं अन् ठाकरे-फडणवीसांची भेट; शिवसेना-भाजपचं नेमकं चाललंय काय..?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 02:55 PM2021-08-27T14:55:51+5:302021-08-27T14:56:01+5:30
कोकणात जनआशीर्वाद सुरू असताना, भाजप नेते शिवसेनेवर बरसत असताना मुंबईत वेगळ्याच घडामोडी
मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अटकेनंतर राज्यात शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष पाहायला मिळाला. शिवसेना, भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडले. पक्ष कार्यालयांची तोडफोड झाली. यानंतर आता वेगळ्याच घडामोडी सुरू झाल्या आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल शिवसेनेबद्दलच्या युतीबद्दल सूचक विधान केल्यानंतर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांचाही सूर थोडा बदलला. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बंद दाराआड १० मिनिटं चर्चा झाली. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
कोकणात नारायण राणेंची जनआशीर्वाद यात्रा सुरू असताना, राणेंसोबत असलेले भाजप नेते शिवसेनेला थेट शिंगावर घेत असताना दुसरीकडे मुंबईत वेगळ्याच घडामोडी सुरू आहेत. मुख्यमंत्री ठाकरेंनी आज सह्याद्री अतिथीगृहात ओबीसींच्या आरक्षण प्रश्नावर एक बैठक बोलावली होती. बैठकीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली. त्यानंतर दरेकर तिथून निघाले आणि फडणवीस-ठाकरेंमध्ये १० मिनिटं बंद दाराआड चर्चा झाली.
काय म्हणाले संजय राऊत?
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी भाजपवर तोफ डागली. मात्र त्यांचा संपूर्ण रोख इतर पक्षांतून आलेल्या नेत्यांवर होता. त्यांचा उल्लेख राऊतांनी बाटगे असा केला. शिवसेना आणि भाजप राजकीयदृष्ट्या वेगळे झाले आहेत. मात्र दोन्ही पक्षांमधला हिंदुत्वाचा धागा कायम आहे. मात्र भाजपमधले बाटगे वातावरण खराब करण्याचं काम करत आहेत. त्यांच्याकडून बेताल वक्तव्यं सुरू आहेत. अशी विधानं देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार यांच्यासारखी भाजपची जुनीजाणती मंडळी कधीही करणार नाहीत, अशा शब्दांत राऊतांनी भाजपमधल्या आयारामांचा समाचार घेतला.
चंद्रकांत पाटील काय म्हणाले?
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल शिवसेना आणि भाजपच्या वाढत्या संघर्षाबद्दल विचारण्यात आलं. त्यावर २०१४ मध्येदेखील अशीच परिस्थिती होती. युती तुटली होती. दोन्ही बाजूला अशीच कटुता होती. मात्र त्यानंतर भाजप-शिवसेनेचं सरकार राज्यात आलं. आता शिवसेना-भाजप आमनेसामने आल्यानं काँग्रेस, राष्ट्रवादीवाले हसून मजा बघत आहेत. आता मजा येईल म्हणून असं त्यांना वाटतंय. मात्र तसं होईल याची खात्री देता येत नाही, असं उत्तर पाटील यांनी दिलं.