मंदिरं उघडू नये यासाठी तुम्हाला दैवी संकेत मिळतात का?; राज्यपालांचा मुख्यमंत्र्यांना खोचक सवाल

By कुणाल गवाणकर | Published: October 13, 2020 01:20 PM2020-10-13T13:20:21+5:302020-10-13T13:40:59+5:30

राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र; उद्धव ठाकरेंचं जोरदार प्रत्युत्तर

cm uddhav thackeray hits back to governor bhagat singh koshyari letter over reopening of temples | मंदिरं उघडू नये यासाठी तुम्हाला दैवी संकेत मिळतात का?; राज्यपालांचा मुख्यमंत्र्यांना खोचक सवाल

मंदिरं उघडू नये यासाठी तुम्हाला दैवी संकेत मिळतात का?; राज्यपालांचा मुख्यमंत्र्यांना खोचक सवाल

Next

मुंबई: राज्यातील मंदिरं खुली करण्याची मागणीसाठी एकीकडे भारतीय जनता पक्षाचे नेते राज्यात विविध ठिकाणी आंदोलनं करत असताना दुसरीकडे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी मुख्यमंत्री उद्घन ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. हॉटेल, बार उघडण्यात आले असताना मंदिरं बंद का, असा सवाल राज्यपालांनी उपस्थित केला आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाची आठवणही करून दिली. राज्यपालांच्या पत्राला हिंदुत्वाला मुख्यमंत्र्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही, असं सडेतोड उत्तर मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलं आहे. 

'लॉकडाऊन शब्द केराच्या टोपलीत टाकायचा आहे असं तुम्ही म्हटलं होतं. मात्र तरीही अद्याप राज्यातील प्रार्थनास्थळं उघडलेली नाहीत. एका बाजूला बार, हॉटेल सुरू करण्यास परवानगी दिली गेली आहे. मात्र प्रार्थनास्थळं बंदच आहेत. देव अजूनही लॉकडाऊनमध्येच आहेत. अनेक शिष्टमंडळांनी, राजकीय नेत्यांनी, सामाजिक संघटनांनी माझ्याकडे प्रार्थनास्थळं सुरू करण्याची मागणी केली आहे,' असं राज्यपालांनी पत्रात नमूद केलं आहे.




राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाची आठवण करून दिली आहे. 'तुम्ही मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अयोध्येला गेला होतात. तुम्ही आषाढी एकादशीला पंढरपूरला भेट दिली. तिथे पूजाही केली. मग आता मंदिर सुरू करू नये यासाठी तुम्हाला दैवी संकेत मिळत आहेत का? तुम्ही अचानक धर्मनिरपेक्ष झालात का?,' असा खोचक सल्ला कोश्यारींनी उपस्थित केला आहे. 

राज्यपालांनी लिहिलेल्या पत्राला मुख्यमंत्र्यांनीदेखील पत्रानंच उत्तर दिलं आहे. 'आपण पत्रात माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला आहे तो योग्यच आहे. मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही. माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणं हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही,' अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांनी प्रत्युत्तर दिलं आहे.




'मी अचानक धर्मनिरपेक्ष झालो का? असा प्रश्न आपल्याला का पडावा? केवळ धर्मस्थळं उघडणं म्हणजे हिंदुत्व आणि न उघडणं म्हणजे धर्मनिरपेक्ष असं आपलं म्हणणं आहे का? मग आपण राज्यपालपदाची शपथ ज्या घटनेनुसार घेतलीत त्या घटनेचा महत्वाचा गाभा धर्मनिरपेक्ष आहे तो आपल्याला मान्य नाही का?,' असा सवाल मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना विचारला आहे.

'मला या संकटाशी लढताना काही दैवी संकेत येतात का? असाही प्रश्न आपणांस पडला आहे, आपल्याला अशा गोष्टींचा अनुभव असेल मात्र मी एवढा थोर नाही. इतर राज्यांत, देशात बरे वाईट काय घडते आहे ते बघत माझ्या महाराष्ट्रात चांगले कसे करता येईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करतो आहे,' असं ठाकरेंनी पत्रात म्हटलं आहे.

'आपण म्हणता गेल्या ३ महिन्यात काही शिष्टमंडळांनी भेटून आपल्याला प्रार्थनास्थळं उघडण्याबद्दल विनंती केली. त्यातील ३ पत्रं आपण सोबत जोडली आहेत. ही तिन्ही पत्रं भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि समर्थकांची आहेत. हा योगायोग असू शकतो. असो आपल्या विनंतीचा महाराष्ट्र सरकार गांभिर्याने विचार करत असून सर्व काळजी घेवून लवकरात लवकर याबाबत निर्णय घेतला जाईल हि खात्री मी आपल्याला देतो,' असं मुख्यमंत्र्यांनी पत्रात नमूद केलं आहे.

Read in English

Web Title: cm uddhav thackeray hits back to governor bhagat singh koshyari letter over reopening of temples

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.