VIDEO: विधानसभेत दिवंगत शिवसैनिकाची आठवण काढत मुख्यमंत्र्यांचा कंगनावर निशाणा; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2020 05:36 PM2020-09-07T17:36:47+5:302020-09-07T18:32:14+5:30
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि कंगना राणौतमध्ये वाकयुद्ध सुरू
मुंबई: अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाकयुद्ध सुरू आहे. शिवसेना खासदार संजय राऊत आणि कंगना यांच्यात जुंपली आहे. त्यातून दोन्ही बाजूनं आव्हानांची भाषा केली जात आहे. मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगनाला शिवसेनेकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. त्यातच आता या वादावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता विधानसभेतून कंगनावर निशाणा साधला.
आजपासून विधिमंडळाच्या अधिवेशनाला सुरुवात झाली. त्यावेळी माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, माजी मंत्री अनिल राठोड यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करणारा प्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुखर्जींच्या आठवणींना उजाळा दिला. प्रणब मुखर्जी अतिशय शांत, संयमी, संवेदनशील आणि अभ्यासू व्यक्तीमत्त्व होतं. कोणत्याच पक्षात त्यांचे शत्रू नव्हते. सगळ्यांनाच ते आपलेसे वाटायचे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी मुखर्जी यांना आदरांजली वाहिली.
BMCचे लोक माझ्या कार्यालयात घुसले, उद्या तोडायची तयारी; व्हिडिओ दाखवत कंगनाचा दावा
शिवसेना नेते आणि माजी मंत्री अनिल राठोड यांच्या निधनाबद्दलही मुख्यमंत्र्यांनी दु:ख व्यक्त केलं. 'अनिल राठोड यांच्या शोक प्रस्तावावर मला बोलावं लागेल, असा विचारही मी कधी केला नव्हता. अनिल राठोड राजस्थानातून महाराष्ट्रात आले. मुंबई, मंचरनंतर नगरला गेले. शिवसेना प्रमुखांच्या हिंदुत्वाच्या विचारानं प्रेरित होऊन त्यांनी चांगलं काम केलं', असं मुख्यमंत्री म्हणाले. अनेक जण इतर प्रांतातून मुंबईत, महाराष्ट्रात येतात. रोजीरोटी कमावतात. नाव कमावतात. काही जण महाराष्ट्राचं ऋण मानतात. काही जण मानत नाहीत, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता कंगना राणौतला टोला लगावला.
महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री श्री. अनिल भैया राठोड जी यांच्या निधनाचा शोक प्रस्ताव आजच्या महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या प्रथम दिनी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मांडला. pic.twitter.com/1eHvWL6TcY
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 7, 2020
काय आहे प्रकरण?
अभिनेत्री कंगना राणौतनं संजय राऊत यांनी आपल्याला धमकी दिल्याचा दावा केला होता. 'मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्यास पुन्हा शहरात येऊ नकोस, असं म्हणत मला राऊत यांनी धमकी दिली असं ती म्हणाली. आधी झळकलेले आझादीचे फलक आणि आता मिळत असलेल्या उघड धमक्या यामुळे मुंबई पाकिस्तान व्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे?' असा सवाल कंगनानं ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केला होता.
कंगना राणौतच्या सुरक्षेसाठी ‘इतके’ जवान तैनात; ‘Y’ दर्जाची सुरक्षा म्हणजे काय रे भाऊ?, जाणून घ्या...
काय म्हणाले संजय राऊत?
कंगनानं महाराष्ट्राची माफी मागितली तर तिला माफ करण्याचा विचार करु, तिने मुंबईचा उल्लेख मिनी पाकिस्तान केला आहे. तिच्यात हिंमत असेल तर जे मुंबईबद्दल बोलली तेच अहमदाबादविषयी बोलेल का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. संजय राऊत यांनी कंगनाबद्दल एक आक्षेपार्ह शब्द वापरला.
“शिवसेनेवर आरोप करणारे मुंबई अन् मुंबादेवीचा अपमान करतायेत"
मुंबईत येतेय, कोणाच्या बापात हिंमत असेल तर अडवा; कंगनाचे खुले आव्हान
"मला अनेक जण मुंबईला परत न येण्याची धमकी देत आहेत, म्हणून मी ठरवले आहे की, येत्या आठवड्यात ९ सप्टेंबरला मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला आहे. मी मुंबई विमानतळावर किती वाजता उतरणार, याची वेळ लवकरच सांगेन. कोणाच्या बापात हिंमत असेल तर आडवा", असे आव्हान कंगनाने दिले आहे.