मोठी बातमी! जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ निर्णयाला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती; राष्ट्रवादीसह शरद पवारांनाही धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 10:52 PM2021-06-22T22:52:36+5:302021-06-22T22:55:18+5:30
शिवसेनेचे आमदार अजय चौधरी यांनी याबाबत तक्रार करणारं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलं होतं.
मुंबई – काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते टाटा कॅन्सर रुग्णालयाला १०० सदनिका देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. खुद्द शरद पवारांच्या हस्ते मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या सदनिकांच्या चाव्या सुपूर्द करण्याचा कार्यक्रम घेतला होता. शरद पवारांच्या मुंबईतील निवासस्थानी हा कार्यक्रम झाला होता. मात्र आता गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या निर्णयाला स्थगिती देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसह शरद पवारांनाही हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.
शिवसेनेचे आमदार अजय चौधरी यांनी याबाबत तक्रार करणारं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलं होतं. त्यावर मुख्यमंत्र्यांनी तपासून अहवाल सादर करा, तोपर्यंत निर्णयाला स्थगिती देण्यात यावी असा शेरा मारला आहे. या निर्णयाबाबत जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मी जो निर्णय घेतला होता तो उदात्त भावनेतून घेतला होता. बाहेर गावावरून येणाऱ्या कॅन्सर रुग्णाच्या नातेवाईकांची सोय व्हावी यासाठी मी निर्णय घेतला होता. त्यात माझा कुठलाही हेतू नव्हता. पण या निर्णयाला स्थगिती येणं ही दुर्दैवाची बाब आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांना कुठेही अंधारात ठेऊन निर्णय घेण्यात आला नव्हता असंही त्यांनी म्हटलं आहे.
त्याचसोबत मुख्यमंत्री हे आमच्या विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत. कुठलाही निर्णय घेताना त्यांना कल्पना दिल्याशिवाय घेतला जात नाही. म्हाडा सदनिका टाटा रुग्णालयाता सुपूर्द करतानाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कल्पना दिली होती. मात्र यात काही गैरसमज झाले आहेत. लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करू अशी माहिती मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. ते टीव्ही ९ शी बोलत होते.
मुख्यमंत्र्यांना कुठला संशय आहे का?
कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईकांसाठी म्हाडानं १०० सदनिका दिल्या, जेव्हा हा निर्णय झाला तेव्हा त्याचं कौतुक केले होते. परंतु या निर्णयाला स्थगिती देण्यापूर्वी संवेदनशीलपणे विचार करायला हवा होता. निर्णय झाला तेव्हा मुख्यमंत्र्यांना विश्वासात घेतलं नव्हतं का? या निर्णयाला स्थगिती देण्यामागे नेमकं काय कारण आहे याचा खुलासा होणं गरजेचे आहे. शिवसेना आमदाराचं पत्र वाचून या निर्णयामागे मुख्यमंत्र्यांना कुठे संशय आहे का? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे.
आमदार अजय चौधरी यांच्यात पत्रात काय म्हटलंय?
शिवडी विधानसभा मतदारसंघातील सुखकर्ता आणि विघ्नहर्ता सोसायटी या पुर्नरचित इमारतींमध्ये ७५० मराठी कुटुंब राहतात. सदर इमारती पुर्नविकसित करण्यात येत असल्याने म्हाडा प्राधिकरणास सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या. या सदनिका रहिवाशी व संक्रमण शिबिरातील रहिवाशी यांना कायम स्वरुपी राहण्याकरिता देणे अपेक्षित होते. परंतु सदनिका त्यांना वितरीत न करता कॅन्सरग्रस्त रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना राहण्याकरिता टाटा रुग्णालयाला देण्याचा निर्णय गृहनिर्माण विभागाने घेतला. त्यामुळे या कुटुंबाने चिंतेचे आणि भितीचे वातावरण निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.