पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागताला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाणार नाहीत, हे आहे "कारण"
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2020 11:34 AM2020-11-28T11:34:30+5:302020-11-28T11:46:18+5:30
PM Narendra Modi in Pune to visit Serum Institute: प्रोटोकॉलनुसार पंतप्रधानांच्या राजकीय दौरे सोडून अन्य दौऱ्यांच्या स्वागताला मुख्यमंत्र्यांनी आणि राज्यपालांनी उपस्थित राहणे गरजेचे असते. मात्र, यावेळी मुख्यमंत्रीच नाहीत तर राज्यपालही मोदींच्या स्वागताला पुण्याला जाणार नाहीत.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज कोरोना लसींच्या उत्पादनाचा आढावा घेण्यासाठी तीन राज्यांच्या दौऱ्यावर आहेत. सध्या ते गुजरातला झायडस पार्कला गेले असून तिथे कोरोना लसीचा आढावा घेत आहेत. यानंतर ते हैदराबादला जाणार आहेत. तेथून पुण्याला येणार असून सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. मात्र, प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेपुणे विमानतळावर पंतप्रधान मोदींच्या स्वागताला उपस्थित राहणार नाहीत.
प्रोटोकॉलनुसार पंतप्रधानांच्या राजकीय दौरे सोडून अन्य दौऱ्यांच्या स्वागताला मुख्यमंत्र्यांनी आणि राज्यपालांनी उपस्थित राहणे गरजेचे असते. मात्र, यावेळी मुख्यमंत्रीच नाहीत तर राज्यपालही मोदींच्या स्वागताला पुण्याला जाणार नाहीत. यामागे पंतप्रधान कार्यालयाने केलेल्या सूचना आहेत.
पंतप्रधान हे आपल्या पुणे दौऱ्यात अगदी छोट्या कालावधीसाठी सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार असून लगेच परतणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री किंवा राज्यपाल यांनी उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही, असे पंतप्रधान कार्यालयाकडूनच कळविण्यात आले आहे. या सुचनेमुळेच मुख्यमंत्री हे पंतप्रधानांचे आगमन व दौऱ्यात उपस्थित राहणार नाहीत, असे मुख्यमंत्री कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.
Prime Minister Narendra Modi arrives at Gujarat's Ahmedabad, to visit the Zydus Biotech Park to review the #COVID19 vaccine development
— ANI (@ANI) November 28, 2020
Later today, the PM will visit Bharat Biotech in Hyderabad and Serum Institute of India in Pune pic.twitter.com/EtDNh5vKMY
महत्वाचे म्हणजे गुजरातमध्येही मुख्यमंत्री विजय रुपाणी पंतप्रधान मोदींच्या स्वागताला आले नव्हते. पंतप्रधानांचे स्वागत पोलीस अधिक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तसेच झायडसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले होते.
शंभर देशांच्या राजदूतांचा पुणे दौरा तात्पुरता रद्द
कोरोना लसीच्या पार्श्वभूमीवर तब्बल शंभर देशांचे राजदूत पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट व जिनोव्हा बायो-फार्मासिटिक्युअल्स कंपनीला 4 डिसेंबर रोजी भेट देणार होते. परंतु राजदूतांचा हा दौरा तात्पुरता रद्द करण्यात आला आहे. दौरा निश्चित झाल्यावर पुन्हा कळविण्यात येईल असे लेखी पत्र आले असल्याचे जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी सांगितले.
#WATCH PM Narendra Modi greets the crowd gathered outside Zydus Biotech Park in Ahmedabad during his vaccine review visit pic.twitter.com/3pKjlGlBP3
— ANI (@ANI) November 28, 2020
इंग्लंडमधील ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत संशोधित होणाऱ्या कोरोनावरील लसीच्या उत्पादनाचे हक्क पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने मिळवले आहेत. ऑक्सफोर्डच्या लसीच्या प्राथमिक चाचण्या समाधानकारक आल्या आहेत.त्यामुळे लस उत्पादनाची जगातली सर्वात मोठी क्षमता असल्याने 'सीरम'कडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर तब्बल शंभर देशांचे राजदूत येत्या 4 डिसेंबर रोजी पुणे दौ-यावर येणार होते. राजदूत येण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शनिवार (दि.28) रोजी तातडीने पुणे दौऱ्यावर येत असून, सीरम इन्स्टिट्यूटमधील लसीचे उत्पादन व वितरण याचा आढावा घेणार आहेत. परंतु आता राजदूतांचा पुणे दौरा तात्पुरता रद्द झाला आहे.