जे दिसतात ते सोबत नसतात, जे सोबत असतात ते दिसत नाहीत; मुख्यमंत्री ठाकरेंचं सूचक विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 07:41 AM2020-08-15T07:41:40+5:302020-08-15T07:42:11+5:30
मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा नेमका अर्थ काय?; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
मुंबई: सध्याचा काळच असा आहे की जे समोर दिसतात, ते सोबत नसतात आणि जे सोबत असतात ते दिसत नाहीत, असं सूचक वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. ‘मार्मिक’च्या हिरक महोत्सवानिमित्त त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. उद्धव यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
‘मार्मिक’ या नियतकालिकास ६० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल एका ऑनलाइन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी दूरचित्रसंवादाद्वारे शिवसैनिकांशी व महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. मीपण नुकताच ६० वर्षांचा झालो व मार्मिकसोबतच वाढलो. मार्मिक शिवसेनेचा जन्मदाता असून ते ६० वर्षांचे होत असताना राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे याचं समाधान असल्याचं ते म्हणाले.
महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना राष्ट्रवादीसोबतचे संबंध, सरकार पाडण्याबद्दल भाजपा नेत्यांकडून केली जाणारी विधानं याचे पडसाद मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणात उमटले. एरवी आपण मेळाव्यात भेटतो तेव्हा तुम्ही सारे समोर असता. आज या ऑनलाइन मेळाव्यात सोबत आहात, पण दिसत नाहीत. सध्याचा काळच असा आहे की जे समोर दिसतात, ते सोबत नसतात आणि जे सोबत असतात ते दिसत नाहीत, असं सूचक विधान ठाकरेंनी केलं.
अन्यायाविरोधात लढणे हाच मराठी बाणा आहे. शिवाजी महाराजांनी मुघलांच्या अन्यायाविरोधात लढाई सुरू केली, तेव्हा हरण्या-जिंकण्याची फिकीर केली नव्हती. तोच शिवसेनेचा विचार आहे. जिंकणार की हरणार याचा विचार न करता लढणार व अन्याय करणाऱ्याला ठेचणारच, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. शिवसैनिकांच्या सोबतीविना सेनापतीला अर्थ नाही, असेही त्यांनी नमूद केले.