...म्हणून निवडणुकीची घोषणा होताच सीतारामण यांना सोडावं लागलं विशेष विमान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 12:50 PM2019-03-11T12:50:48+5:302019-03-11T12:56:45+5:30
मुख्य निवडणूक आयुक्तांनी रविवारी संध्याकाळी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला.
चेन्नई- मुख्य निवडणूक आयुक्तांनी रविवारी संध्याकाळी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. या कार्यक्रमानुसार देशात सात टप्प्यांत मतदान होणार आहे. 11 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीचा पहिला तर 19 मे रोजी सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार आहे. तसेच 23 मे रोजी मतमोजणी होईल. निवडणुकीची घोषणा होताच देशभरात आचारसंहिता लागू झाली. ही आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळेच निर्मला सीतारमण यांना स्वतःचं विशेष विमान सोडून कमर्शियल फ्लाइटनं दिल्लीत यावं लागलं.
सीतारामण यांनी चेन्नईतल्या आयोजित कार्यक्रमात सहभाग घेतला होता. तेव्हा त्यांनी सरकारी गाडीचा वापर केला नव्हता. तसेच भाजपाच्या एका नेत्याच्या गाडीतूनच त्या विमानतळावर पोहोचल्या. संरक्षण मंत्री विशेष विमानानं जाणार होत्या. परंतु त्याचदरम्यान आदर्श आचारसंहिता लागू झाली. निवडणूक आयोगानं सात टप्प्यांत लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर केली. भारतीय जनता पार्टीच्या एका प्रसिद्धीपत्रकात यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. सीतारामण एका खासगी कंपनीच्या विमानानं रात्री आठ वाजून 40 मिनिटांनी दिल्लीसाठी रवाना होणार होत्या. परंतु आचारसंहितेमुळे त्यांना कमर्शियल विमानानं दिल्लीत पोहोचावं लागतं.
काय आहे आचारसंहिता?
आचारसंहितेमध्ये काही अटी आणि शर्थींचं पालन करावं लागतं. यादरम्यान राजकीय नेत्यांसाठी काही नियम केले जातात. या नियमांचं राजकीय नेते आणि संभाव्य उमेदवाराला पालन करावं लागतं.
केव्हा लागू होते आचारसंहिता?
निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर लागलीच आचारसंहिता लागू होते. संविधान कलम 324अंतर्गत निष्पक्ष निवडणुका संपन्न होण्याचा मानस असतो. याचदरम्यान राजकीय नेते आणि उमेदवारांना नियमांचं पालन करावं लागतं. जर नियमांचं कोणीही उल्लंघन केल्यास त्याच्यावर कारवाई केली जाते.